Riteish Deshmukh School Video : मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली ‘लय भारी’ ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. रितेशचं बालपण लातूरमध्ये बाभळगाव येथे गेलं. याठिकाणी देशमुख कुटुंबीयांचं सुंदर असं घर आहे. सध्या कामानिमित्त रितेश मुंबईत असतो. अभिनेत्याचं बालपण लातूरमध्ये गेलं असलं तरीही शालेय शिक्षण एका वेगळ्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. याबद्दल अभिनेत्याने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अभिनेता रितेश देशमुख गेल्या काही महिन्यांपासून त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं शूटिंग सातारा-महाबळेश्वर या परिसरात सुरू असल्याच्या चर्चा सर्वत्र होत्या. पाचगणी येथे गेल्यावर तब्बल ४० वर्षांनी रितेशने एका खास जागी भेट दिली आहे.
रितेशचं शालेय शिक्षण मुंबई-पुण्यात किंवा लातूरमध्ये नव्हे तर पाचगणीत पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावर शाळेच्या परिसरातील व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने याला “मी माझ्या शाळेच्या मैदानात ४० वर्षांनंतर गेलो…” असं कॅप्शन दिलं आहे. यापुढे नमूद केलेल्या हॅशटॅगमध्ये अभिनेत्याने शाळेचं नाव आणि लोकेशन दिलं आहे. रितेशच्या शाळेचं नाव संजीवन विद्यालय असून या शाळेच्या शरद पंडित स्टेडियमवर अभिनेता गेला होता. अभिनेत्याने या पोस्टवर ‘हॅशटॅग पाचगणी’ असंही लिहिलं आहे.
या व्हिडीओवरून अभिनेत्याचं शालेय शिक्षण पाचगणीत पूर्ण झाल्याचं स्पष्ट होत आहे. रितेशला खरंतर आर्किटेक व्हायचं होतं. यानुसार, त्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील ‘रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’मध्ये प्रवेश घेतला. यानंतर परदेशातील एका नामांकित कंपनीत त्याने जवळपास एक वर्ष आर्किटेक्ट म्हणून काम केलं. परंतु, याच दरम्यान रितेशला चित्रपटासाठी विचारणा झाली अन् तो अभिनय क्षेत्राकडे वळला.
दरम्यान, रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, त्याने दिग्दर्शित केलेला ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी मराठीसह इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय रितेशची पत्नी जिनिलीया देशमुख देखील या सिनेमात झळकणार आहे.