Salman Khan Responds Abhinav Kashyap Allegations : काही दिवसांपासून ‘दबंग’ सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप अभिनेता सलमान खानवर अनेक आरोप करताना दिसत आहे. दिग्दर्शकानं काही मुलाखतींमधून सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल अनेक गंभीर आरोप केले. त्यानं सलमानला ‘गुंड’देखील म्हटलं. तसेच त्याच्या कुटुंबीयांबद्दलही त्यानं टिप्पणी केली आहे. एवढंच नाही, तर त्यानं असा दावाही केला की, सलमानमुळे त्यांचं करिअर उद्ध्वस्त झालं.
अभिनव कश्यपच्या या आरोपांवर आता सलमान खाननं अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. सलमान सध्या ‘बिग बॉस’ शोचं सूत्रसंचालन करीत आहे. अशातच नुकत्याच झालेल्या शनिवार (२७ सप्टेंबर)च्या ‘वीकेंड का वार’ या भागात त्यानं अभिनवबद्दल अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं.
‘बिग बॉस’मधील स्पर्धक तान्या मित्तलचा वाढदिवस होता. यावेळी सलमाननं तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तान्यानं सलमानकडे अशी इच्छा व्यक्त केली की, सलमाननं तिच्या कुटुंबासारखं व्हावं, जेणेकरून तिला इथे मुंबईत सुरक्षित वाटेल.
त्यांवर सलमान म्हणाला, “जे लोक पूर्वी माझ्याशी जोडले गेले होते, ते आज अडचणीत आहेत. ज्यांनी आधी माझं कौतुक केलं होतं, तेच लोक ‘मी त्यांना आवडत नाही’, असं म्हणतायत. आता लोक पॉडकास्टमध्ये जाऊन काहीही बोलत आहेत, काहीही बडबड करीत आहेत. कारण- त्यांच्याकडे काही काम नाही. मी सर्वांना एकच विनंती करीन की, काहीतरी काम करा.”
सलमाननं आपल्या या वक्तव्यात कुठेही अभिनव कश्यपचं नाव घेतलं नाही; पण त्यानं दिग्दर्शकावर अप्रत्यक्षपणे पलटवार केला असल्याचं त्याच्या या वक्तव्यातून लक्षात येत आहे.त्यानंतर सलमाननं घरातील सदस्यांनाही सांगितलं की, काहीही झालं तरी कामावर लक्ष केंद्रित करायला हवं.
दरम्यान, अलीकडील एका मुलाखतीत अभिनव कश्यपनं असा दावा केला की, सलमाननं त्याचा भाऊ अनुराग कश्यपला ‘तेरे नाम’ चित्रपटातून काढून टाकलं होतं. जेव्हा सलमाननं अनुरागच्या नवीन चित्रपट ‘निशांची’ला पाठिंबा दिला, तेव्हा अभिनव म्हणाला की, हे सगळं फेक आहे. त्यानं म्हटलं होतं की, “आता सलमान आमचे पाय चाटेल. गुडघ्यावर येऊन भीक मागेल.”