Salman Khan On Trigeminal Neuralgia : बॉलीवूडचा ‘दबंग’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सलमान खान. आपल्या अभिनयानं अनेक वर्षांपासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. निरागस आणि शांत भूमिकांबरोबरच त्यानं आपल्या काही अॅक्शन भूमिकांमधूनही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाच्या साठीत पोहोचलेला सलमान अजूनही त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत येत असतो.

सध्या सुदृढ आणि तंदुरुस्त दिसत असलेल्या सलमाननं मात्र एकदा गंभीर आजाराचाही सामना केला आहे. या आजाराबद्दल त्यानं याआधी कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्यानं पुन्हा एकदा या आजारामुळे झालेल्या त्रासाची आठवण व्यक्त केली. हा आजार इतका भयंकर आहे की, त्यामुळे होणाऱ्या वेदना म्हणजे अक्षरश: मरणयातनाच…

त्या आजारामुळे सलमानला तब्बल सात वर्षांहून अधिक काळ असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. आता तो बरा आहे, पण त्यावेळी त्याच्यावर केल्या गेलेल्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल आठ तास लागले होते. या आजाराचं नाव आहे, ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’. ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये सलमान खाननं त्याच्या या आजाराविषयी पुन्हा एकदा सांगितलं.

सलमान म्हणाला, “जेव्हा मला ‘ट्रायजेमिनल न्युराल्जिया’ झाला होता, तेव्हा इतका भयंकर त्रास होत होता की, तो त्रास तुमच्या शत्रूलाही होऊ नये, असं वाटायचं. हा त्रास मला सात ते साडेसात वर्षं होता. दर चार-पाच मिनिटांनी वेदना जाणवायच्या. मला सकाळचा नाश्ता करायलासुद्धा दीड तास लागायचा. फक्त एक ऑम्लेट खाणंही अशक्य व्हायचं; पण तरीसुद्धा मला जबरदस्तीनं ते खावं लागायचं.”

त्यानंतर सलमान म्हणाला, “सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की, माझ्या दातांमध्ये काहीतरी झालं असावं. पण नंतर जेव्हा समजलं की, दारू प्यायल्यानंतर वेदना वाढतात, तेव्हा डॉक्टरांनी हा मज्जातंतूंशी संबंधित आजार असल्याचं सांगितलं. ‘पार्टनर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लारा दत्तानं माझ्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले; तेव्हाच पहिल्यांदा ही वेदना झाली होती. मी तेव्हा म्हणालो होतो, ‘वा लारा, करंट लागल्यासारखं वाटलं!’ आणि तिथून सगळं सुरू झालं.”

पुढे सलमान म्हणाला, “आता मला काही त्रास नाही; पण या आजाराची वेदना इतक्या भयानक आहेत की, त्यामुळे त्याला ‘सुसाइडल डिसीज’ म्हणतात. या आजारामुळे जगभरात सर्वाधिक आत्महत्या होतात.”

सलमान खान इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर सलमाननं सांगितलं, “मी स्वतःचा अनुभव शेअर करीत आहे. कारण- बरेच लोक या आजाराबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. पण, आता या आजारावरील उपचार सोपे झाले आहेत. गॅमा नाइफ सर्जरी नावाची एक प्रक्रिया असते. त्यामध्ये चेहऱ्यावर स्क्रू लावतात आणि सात-आठ तास झोपवून ठेवतात. मग त्यानंतर गॅमा नाइफने उपचार करतात.” सलमानने सांगितलं की, त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की, सर्जरीनंतर वेदना फक्त २०-३० टक्के कमी होतील; पण नशिबानं त्याला आता काहीच त्रास होत नाहीय.”

दरम्यान, त्याच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झाल्यास, लवकरच तो ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.