शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ऑक्टोबर २०२१ मध्ये एका क्रूझवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन जवळजवळ एक महिना कोठडीत होता. त्याला अटक करणारे अधिकारी समीर वानखेडे यांनी त्या प्रकरणावर टिप्पणी केली आहे. समीर वानखेडे यांनी आर्यनच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या शोमधील एका दृश्यावर काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. त्यांनी कोर्टात मानहाणीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर आता ते आर्यनच्या अटकेबद्दल बोलले आहेत.

त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज आढळले नसले तरी आर्यन खानला अटक करणं हा नोकरीचा भाग होता, असं समीर वानखेडे यांनी सांगितलं. त्या परिस्थितीत आर्यन ‘बळीचा बकरा’ ठरला होता का? तसेच आर्यनच्या सुटकेच्या बदल्यात २५ कोटी रुपये मागितल्याच्या आरोपात काही तथ्य आहे का? असं समीर यांना विचारण्यात आलं.

मामाज काउच या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडेंनी सांगितलं की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार ते आर्यन खानच्या प्रकरणाबद्दल माध्यमांसमोर बोलणार नाहीत. पण मुलाखत घेणाऱ्याने त्यांना आर्यनच्या प्रकरणाबद्दल थेट प्रश्न विचारले. त्यामुळे समीर वानखेडेंनी उत्तरं दिली, पण आर्यनचं नाव घेणं टाळलं.

लोकांचा गैरसमज आहे की…

आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज नसताना त्याला २५ दिवस कोठडीत का ठेवण्यात आलं? असं विचारल्यावर समीर म्हणाले की जेव्हा ते एखाद्याला अटक करतात तेव्हा त्यांच्याकडे ड्रग्ज असणं आवश्यक नाही. “लोकांचा असा गैरसमज आहे की जर तुमच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत तर कोणतीही कारवाई होणार नाही. जर कोणी ड्रग्जसह पकडलं गेलं असेल तर कोणीतरी ते बनवले असतील, कोणीतरी ते पुरवले असतील आणि कोणीतरी ते खरेदी करण्याचा विचार करत असेल. आपण ते बनवणाऱ्यांना किंवा ते खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना अटक करू नये, असं तुम्हाला वाटतं का? कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये सर्वांना अटक करावी लागते,” असं समीर वानखेडे म्हणाले.

आर्यन खान बळीचा बकरा?

या प्रकरणात आर्यन खानला बळीचा बकरा बनवण्यात आलं का? असा थेट प्रश्न समीर वानखेडेंना विचारण्यात आला. तेव्हा “यात कोणीच बळीचा बकरा बनत नाही” असं समीर म्हणाले. “अशा प्रकरणांमध्ये काही इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत का, कोणाचे जबाब आहेत का, या सर्व गोष्टींच्या आधारे खूप विचारपूर्वक तपास केला जातो,” असं समीर वानखेडेंनी नमूद केलं. त्यानंतर जामीन मंजूर करण्यासाठी ज्या अनेक कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागतो, त्याचा उल्लेख केला. “या सगळ्या गोष्टी फक्त वानखेडेच करत नाहीत, तर यातही अनेक प्रक्रिया असतात,” असं वानखेडे म्हणाले.

लीक झालेल्या चॅट्सबद्दल समीर वानखेडे म्हणाले…

समीर वानखेडेंवर शाहरुख खानबरोबरच्या चॅट्स लीक केल्याचा आरोप झाला होता. चॅटमध्ये शाहरुख आर्यनला सोडण्याची विनंती करत होता. याबद्दल विचारल्यावर वानखेडे म्हणाले, “लीक करणे हा शब्द इथे चुकीचा आहे. ही माझी सवय नाही आणि अशा गोष्टी करण्याइतका मी कमकुवत नाही. मला अशा गोष्टी करण्याची गरज नाही.”

समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपाबद्दलही उत्तर दिलं. “तुम्ही सर्वांनी चॅट्स पाहिल्या आणि चॅट्समध्ये जे आहे ते पुन्हा मला पुन्हा सांगायचं नाही. मी कारवाई केली आणि कोणालाही सोडलं नाही. मी फक्त अटक केली होती, बाकी काहीच नाही,” असं समीर वानखेडेंनी स्पष्ट केलं.