Sanjay Dutt Shares His Jail Experience : बॉलीवूडच्या काही लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव म्हणजे संजय दत्त. संजय दत्तनं त्याच्या व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळवलं. खूप प्रसिद्धी मिळवली. पण या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहीलं. आपल्या प्रसिद्धीच्या आणि यशाच्या शिखरावर असताना संजय दत्तला तुरुंगात जावं लागलं होतं.
तुरूंगात असताना संजय दत्तला अनेक अनुभव आले. या अनुभवांबद्दल अभिनेत्याने याआधी ठिकठिकाणी काही मुलाखती आणि विविध कार्यक्रमांमधून खुलासा केला आहे. अशातच त्याने नुकत्याच एका कार्यक्रमात तुरुंगातला एक धक्कादायक किस्सा सांगितला. हा किस्सा म्हणजे एका संजय दत्तची दोन खून केलेल्या आरोपीशी झालेली भेट.
याबद्दल संजय दत्तने सांगितलं, “एक दिवस तुरुंगातील एका पोलिस अधिकाऱ्यांनी मला दाढी कापायला सांगितली. यासाठी मी आधी नाही म्हटलेलं. पण मग नंतर तयार झालो. त्यांनी एक ‘मिश्रा जी’ नावाच्या व्यक्तीला बोलावलं, ज्याच्या हातात धारदार वस्तरा होता.”
यापुढे संजय दत्त सांगतो, “दाढी करायच्या सुरूवातीलाच मी त्याला बोलता बोलता विचारलं, ‘किती वर्षे झाले तुरुंगात?’ तर तो म्हणाला, ‘१५ वर्षं’. तोपर्यंत त्याचा वस्तरा माझ्या मानेपर्यंत पोहोचला होता.” यानंतर मी त्याला पुढचा प्रश्न विचारला की, ‘काय गुन्हा केला?’ आणि त्याचं उत्तर ऐकून माझ्या अंगावर तेव्हा अक्षरश: काटा आला होता. तो उत्तर देत म्हणालेला, ‘डबल मर्डर.’ तेव्हा मी पटकन त्याचा हात धरला आणि वस्तरा बाजूला केला. म्हणजे काय… डबल मर्डर केलेल्या आरोपीने माझ्या मानेवर वस्तरा धरला होता.”
संजय दत्त इन्स्टाग्राम पोस्ट
संजय दत्तने नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने हा किस्सा सांगितला. तसंच या शोमध्ये संजय दत्त आपल्या आयुष्यातील कुठल्याही गोष्टीचा पश्चात्ताप नसल्याचंही म्हणाला. तसंच त्याने त्याचे आई-वडील, नरगिस आणि सुनील दत्त, थोडं अधिक काळ जिवंत असते तर बरं झालं असतं अशी खंतही व्यक्त केली.
याशिवाय संजय दत्तने सांगितलं की, तुरुंगात असताना मी सुतारकाम केलं, खुर्च्या बनवल्या, कागदाच्या पिशव्या तयार केल्या आणि त्यासाठी पैसेही मिळत असत. तसेच, त्यांनी ‘रेडिओ YCP’ नावाचं एक खास रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं. जे फक्त कैद्यांसाठी होतं. यात काही कैदी विषय ठरवत आणि काही जण विनोदी स्क्रिप्ट लिहायचे. संजय स्वतः त्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करत असत.