Sanjay Dutt Female Fan Incident : चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील याला काही परिसीमा नाही. आवडत्या कलाकारांसाठी चाहते कायमच हटके आणि अतरंगी गोष्टी करत असतात. मग ते त्यांच्या बंगल्यांबाहेर तासनतास वाट पाहणं असो, त्यांचं चित्र काढणं असो किंवा त्यांच्या प्रेमापोटी अख्खा सिनेमा हॉल बुक करणं असो… चाहते कायमच आवडत्या कलाकारासाठी हटके गोष्टी करताना दिसतात.

अशीच एक चाहती होती, जिने आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावे तिची प्रॉपर्टी केली होती आणि ही चाहती होती अभिनेता संजय दत्तची. हो… हे खरं आहे… मुंबईतील एका चाहतीने संजय दत्तवरील प्रेमापोटी तिची कोटींची संपत्ती त्याच्या नावावर केली होती. याबद्दल संजय दत्तने याआधी कर्ली टेल्सशी साधल्या संवादात खुलासा केला होता. अशातच त्याने आता हा प्रसंग पुन्हा एकदा शेअर केला आहे.

संजय दत्त नुकताच त्याचा मित्र सुनील शेट्टीबरोबर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाला. यावेळी त्याला गप्पांदरम्यान, कपिलने चाहतीच्या या प्रॉपर्टीच्या जुन्या आठवणीबद्दल विचारलं. तेव्हा संजय दत्तने सांगितलं की, “हो, ही घटना खरी आहे. पण मी तिची प्रॉपर्टी स्वीकारली नाही, कारण त्यावर माझा काहीच हक्क नव्हता. एक दिवस पोलीस स्टेशनमधून मला फोन आला, तर सुरुवातीला मला वाटलं की, आता मी काय केलं? पण फोनवर पोलिसांनी सांगितलं की, एका महिलेनं तिची पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून ठेवली आहे.”

यानंतर संजय दत्त सांगतो, “या घटनेबद्दल मी चौकशी केली, तर समजलं की ती महिला दक्षिण मुंबईत काही इमारतींची मालकीण होती आणि तिची एकूण संपत्ती अंदाजे १५० कोटी रुपये इतकी होती. पण मी स्पष्ट सांगितलं की, ‘माझा तिच्याशी काहीही संबंध नव्हता, कदाचित ती माझी चाहती असावी. माझा तिच्या मालमत्तेवर काही हक्क नाही.’ मी ती मालमत्ता तिच्या कुटुंबीयांना परत केली, पण एक अट घातली की, ती योग्य रितीने वापरली गेली पाहिजे.”

दरम्यान, काही वृत्तांनुसार, २०१८ मध्ये निशा पाटील नावाच्या महिलेला गंभीर आजार झाला होता आणि तिच्या मृत्यूपूर्वीच तिने तिच्या प्रॉपर्टीची व्यवस्था करून ठेवली होती. मृत्यूनंतर संजय दत्तचे वकील तिच्या कुटुंबीयांशी संपर्कात आले आणि तिची मालमत्ता परत केली गेली.

संजय दत्तच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, तो ‘बागी ४’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाने भारतात आतापर्यंत फक्त ४० कोटींचं कलेक्शन केलं आहे, जे मागील ‘बागी’ चित्रपटांच्या तुलनेत खूपच कमी आहे.