Shabana Azmi on marriage with Javed Akhtar: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शबाना आझमी यांची ओळख आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत विविध छटा असलेल्या भूमिका साकारल्या आहेत..

अभिनयाबरोबरच शबाना आझमी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. जावेद अख्तर यांच्याबरोबरचे त्यांचे लग्न हा कायमच चर्चेचा विषय असतो. आजही त्यावर अनेकदा बोलले जाते.

बॉलीवूडचे लोकप्रिय गीतकार आणि गाजलेल्या चित्रपटांचे लेखक जावेद अख्तर यांच्याशी त्यांनी १९८४ साली लग्नगाठ बांधली. जावेद अख्तर यांचे हे दुसरे लग्न होते. शबाना आझमी यांच्याबरोबर लग्नगाठ बांधण्या अगोदर त्यांनी हनी इराणी यांच्याशी लग्न केले होते आणि त्यांना दोन मुले होती. फरहान आणि झोया अख्तर अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे शबाना आझमींनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करू नये, असे त्यांना अनेकांनी सांगितले होते. विरोध असतानादेखील शबाना आझमींनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

“त्यामुळे मी गप्प राहण्याचा…”

ट्वि्ंकल खन्नाला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी यांनी सांगितले होते की, आई आणि वडिलांनी त्यांच्या लग्नाच्या निर्णयाला विरोध केला होता. त्या म्हणालेल्या, “त्या काळात मी ज्या प्रकारच्या भूमिका साकारत होते, त्यामुळे लोक माझ्याकडे स्त्रीवादी म्हणून पाहत होते, त्यामुळे मी जावेद यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर लोक मला ढोंगी म्हणू लागले. जावेद यांचे आधीच लग्न झाले होते. त्यांना मुले होती. त्यावेळचा प्रसंगच मोठा कठीण होता. आमचे लग्न झाल्यानंतर लोक मला म्हणू लागले की, स्वत:ला स्त्रीवादी समजते, मग असे का केले? त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करू शकले, बोलू शकले असते; पण मला वाटले की लोक त्यावर खूप चर्चा करतील, त्यामुळे मी गप्प राहण्याचा निर्णय घेतला. वेळेनुसार लोकांना कळेल की नेमके काय घडले होते.”

सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत, शबाना आझमी यांनी असा खुलासा केला होता की, फक्त माझ्या पालकांचा या लग्नाला विरोध होता असे नाही; तर इतर अनेकांनी मला इशारा दिला होता. जेव्हा त्यांना विचारले की त्यांना असे कधी वाटले होते की जावेद अख्तर त्यांना कधी धोका देतील? यावर शबाना आझमी म्हणालेल्या, “मी कधीच असा विचार केला नाही की जावेद मला फसवतील, मला धोका देतील. लोक मला म्हणायचे की जावेद माझा विश्वासघात करतील. पण, आमच्यातील विश्वास वर्षानुवर्षांच्या नात्यातून तयार झाला आहे. आम्ही अग्निपरीक्षेतून गेलो आहोत. ते माझा कधीही विश्वासघात करणार नाहीत.”

झोया व फरहान अख्तर यांच्याबरोबर त्यांचे जे छान नाते तयार झाले, त्याचे श्रेय जावेद यांची पहिली पत्नी हनी इरानी यांना दिले. शबाना आझमी म्हणालेल्या, “मुलांबरोबर जे नाते तयार झाले, ती चांगली गोष्ट घडली. त्याचे सर्व श्रेय हनी इरानीला जाते. हे सगळं घडत असताना त्यांनी कधीही माझ्याविरुद्ध मुलांच्या मनात विष कालवलं नाही. असे केल्याने कदाचित त्यांना न्याय मिळाला असता, पण त्यांनी तसे कधीच केले नाही. खरंतर, तिने आमच्याबरोबर मुले खूप लहान असताना लंडनला पाठवली. त्यांच्याबरोबर आमचे इतके चांगले नाते बनले, त्यामध्ये त्यांचे, माझे आणि जावेदचे श्रेय आहे.”