ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना बॉलिवूडचे ‘शॉटगन’ म्हणून ओळखलं जातं. ते चित्रपटसृष्टीसह खऱ्या आयुष्यातही त्यांच्या डॅशिंग पर्सनिटीसाठी ओळखले जातात. शत्रु्घ्न सिन्हा यांनी आतापर्यंत विविध चित्रपटात काम केले आहे. सर्वांना ‘खामोश’ करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलिवूड बबल’ या युट्यूब चॅनलवरील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता दिग्दर्शक अरबाज खान करतो. त्याच्या या कार्यक्रमात मनोरंजनविश्वातील मोठमोठ्या कलाकारांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारल्या जातात. नुकतंच या कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांनी हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न यांनी त्यांच्या चेहेऱ्यावर असलेल्या जखमेच्या खुणेमागचा एक किस्सा सांगितला.

आणखी वाचा : रणबीर कपूरला त्याचा ‘हा’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायला आवडेल; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

शत्रुघ्न म्हणाले, “मी लहानपणी खूप खोडकर होतो, मी माझ्या काकाला दाढी करताना बघायचो आणि त्याची नक्कल करताना एक दिवस मी उस्तरा घेतला आणि दाढी करू लागलो तेव्हा माझ्या गालावर मोठी जखम झाली.” नंतर जेव्हा ते इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा त्यांच्या मनात या जखमेमुळे चांगलाच न्यूनगंड निर्माण झाला होता. शत्रुघ्न हे चेहेऱ्याची प्लॅस्टिक सर्जरि करणार होते.

याबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी तेंव्हा स्ट्रगल करत होतो, माझी देव आनंद यांच्याशी बऱ्याचदा गाठभेट व्हायची. त्यांनीच मला सर्जरी न करता काम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की त्यांच्या सुद्धा दातामध्ये फट होती, पण कालांतराने ती फॅशन बनली. मला माझ्या जखमेच्या खुणेचा खूप त्रास व्हायचा. असा विचित्र चेहेरा घेऊन मी या क्षेत्रात कसं नाव कमावणार याची मला चिंता असायची.”

नंतर मात्र खलनायक आणि सहाय्यक भूमिका करता करता शत्रुघ्न यांना मुख्य नायकाच्या भूमिका मिळायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘काला पत्थर’, ‘युद्ध’, ‘दोस्ताना’सारखे कित्येक हीट चित्रपट त्यांनी दिले. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणातही नशीब आजमावलं आहे. शिवाय ते त्यांचं मत परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughna sinha speaks about the scar on his face dev anand gives him the best advice avn