सुपरस्टार रजनीकांत यांची प्रसिद्धी आणि त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही चाहते त्यांचे जुने चित्रपटही आवडीनं पाहतात. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे प्रत्येक नवख्या कलाकारासाठी मोठी पर्वणीच. बॉलीवूड अभिनेत्री शीबा आकाशदीप हिनं सिनेविश्वात पाऊल ठेवल्यावर तिला पहिल्याच चित्रपटातून ही संधी मिळाली. आता शीबानं रजनीकांत यांची प्रसिद्धी आणि चाहत्यांचं त्यांच्यावरील प्रेम सांगताना काही किस्से सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीबा आकाशदीपनं नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. त्यावेळी तिनं रजनीकांत यांची प्रसिद्धी, तसेच चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी किती वेडे होतात हे सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी आजवर ज्या ज्या व्यक्तींना भेटले आहे, त्यांच्यापैकी रजनीकांत सर्वांत जास्त नम्र व्यक्ती आहेत.” पुढे शीबा म्हणाली, “रजनीकांत यांची प्रसिद्धी इतकी जास्त आहे की, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी पहाटेपासून रांगेत उभे राहायचे. रजनीकांत जर पहाटे ४ वाजता शूटिंगसाठी येणार असतील, तर तेव्हापासून हजारोंच्या संख्येने चाहते तेथे उपस्थित असायचे.”

“त्यांच्या पायाची धूळ चाहत्यांसाठी प्रसाद”

शीबानं पुढे रजनीकांत यांना चाहते देव मानतात, असंही सांगितलं आहे. ती म्हणाली, “मी शूटिंगच्या वेळी पाहिलं आहे, ते ज्या ठिकाणाहून चालत पुढे जायचे तेव्हा त्यांच्या पायांचा स्पर्श झालेली धूळ चाहते गोळा करायचे. ही धूळ चाहते एका प्रसादाच्या स्वरूपात आपल्याजवळ ठेवत होते. लोक मोठमोठे फुलांचे हार घेऊन यायचे आणि रजनीकांत यांना त्याने सजवायचे.”

“मातीशी जोडलेली व्यक्ती”

“रजनीकांत यांची प्रसिद्धी फार जास्त असूनही त्यांना कधीच त्याचा गर्व झाला नाही. ते नेहमी मातीशी जोडलेले राहिले आहेत”, असंही शीबानं सांगितलं. पुढे एका कार्यक्रमात बऱ्याच वर्षांनी ती त्यांना भेटली तेव्हाची आठवणही तिनं सांगितली आहे. शीबा म्हणाली, “बऱ्याच वर्षांनी एका कार्यक्रमात मी एकदा रजनीकांत यांना भेटले होते. तेव्हा मला पाहून ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझी विचारपूस केली. मी कोण आहे हे त्यांच्या लक्षात होते. ज्या व्यक्ती मला ओळखत होत्या, त्या सर्वांपासून मी लांब गेले होते. त्यामुळे मी रजनीकांत यांच्या आठवणीत असेन, असं मला वाटलं नव्हतं.”

मालिका आणि सिनेमांतून आपल्या अभिनयाद्वारे शीबा आकाशदीप घराघरात पोहचलेली आहे. तिनं अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. तसेच तमीळ चित्रपटांतही तिनं काम केलं आहे. १९९० पासून तिनं आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘अथिसया पिरवी’ हा तिचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर तिनं ‘ये आग अब बुझेगी’, ‘बारीश’, ‘ज्वालामुखी’ अशा अनेक चित्रपटांतून काम केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheeba akashdeep recall rajinikanth fans collected the sand he walked on as prasad rsj