Sholay Director Talk About Dharmendra And Hema Malini : १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटानं भारतीय सिनेइंडस्ट्रीत इतिहास रचला. या चित्रपटानं अनेकांना स्टारडम, पैसा मिळवून दिला. त्यामुळे गेल्या ५० वर्षापासून ‘शोले’ या ना त्या कारणामुळं कायमच चर्चेत राहत राहिला आहे. ‘शोले’ चित्रपटातील संवाद दिग्दर्शन, संगीत आणि अशा अनेक तांत्रिक बाबींवर अनेक दशकांपासून चर्चा होत आली आहे.

अशातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी चित्रपटाच्या कास्टिंगबद्दलचे काही अनुभव शेअर केले आहेत. ‘शोले’मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, संजीव कुमार, अमजद खान यांच्यासह हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमामुळे या जोडीची केमिस्ट्री पडद्यावरही छान खुलून आली.

‘शोले’ सिनेमात गब्बर हे खलनायकाचं पात्र साकारण्याची इच्छा अमिताभ बच्चन, संजीव कुमारसह धर्मेंद्र यांनीसुद्धा दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्याकडे व्यक्त केली होती. याबद्दल रमेश सिप्पी यांनी ‘स्क्रीन’ मासिकासाठी दिलेल्या खास मुलाखतीत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

या मुलाखतीत रमेश सिप्पींना अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला जय नाही, तर गब्बरची भूमिका करायची होती. जर त्यांनी गब्बरची भूमिका केली असती, तर चित्रपट वेगळाच झाला असता का? असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाचं उत्तर देताना रमेश सिप्पी म्हणाले, “एखादा उत्तम कलाकार कुठलीही भूमिका घेतो, तेव्हा तो ती भूमिका छानच करतो. यात काहीच शंका नाही. पण आज मागे वळून पाहिलं, तर गब्बरच्या भूमिकेत अमजद खानशिवाय कुणी दुसरा शोभेल का? त्यांनी ती भूमिका इतकी छान केली की, अजून कुणी या भूमिकेत योग्य असल्याचं वाटत नाही. तसंच, अमिताभने जयची भूमिका उत्तम केली. संजय कुमारनाही वाटत होतं की, त्यांनी गब्बरची भूमिका करावी.”

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)

यानंतर ते सांगतात, “धर्मेंद्रजींनासुद्धा वाटलं की, ही कथा तर ठाकुरभोवती फिरते आणि गब्बर हे खलनायकाचं पात्र खूपच छान आहे, तर त्यांनी ती भूमिका करावी का? पण तेव्हा मी त्यांना म्हटलेलं, “धरमजी, तुम्ही कुठलीही भूमिका करू शकता, पण मग तुम्हाला हेमा मालिनी नाही मिळणार. शेवटी प्रत्येकाने आपापली भूमिका उत्तम निभावली आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांसमोर आहे.”

यापुढे त्यांना धर्मेंद्र-हेमा मालिनी आणि अमिताभ-जया बच्चन यांचं खऱ्या आयुष्यातील प्रेम चित्रपटातील केमिस्ट्रीसाठी उपयोगी ठरलं का? असं विचारण्यात आलं. याबद्दल रमेश सिप्पी म्हणतात, “माझ्या मते, त्यांच्या खऱ्या आयुष्यात प्रेमाचं नातं नसतं, तरीही ते त्यांनी आपल्या अभिनयातून तेवढंच छान काम करून दाखवलं असतं. कारण ते सगळेच खूप उत्कृष्ट कलाकार आहेत. पण कदाचित खऱ्या आयुष्यात जे घडत होतं, त्यामुळे त्यांच्या अभिनयामध्ये आणि भूमिकांमध्ये वास्तवाची थोडी झलक आली असावी. पण पुन्हा सांगतो, हे सगळं ते त्यांच्या अभिनयातूनही उत्तमपणे मांडू शकले असते.”