गायिका सोनू कक्कर(Sonu Kakkar)ने नुकतीच सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट शेअर केली होती. सोनू कक्करने तिच्या भावंडांशी नाते तोडल्याचे तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले होते. नेहा कक्कर व टोनी कक्करची ती बहीण आहे. या दोघांशी तिने संबंध तोडल्याचे तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते. तिच्या या पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला होता. आता कलाकारदेखील यावर वक्त होताना दिसत आहे. शिव ठाकरे(Shiv Thakare)ने यावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल भयानीशी बोलताना शिव ठाकरे म्हणाला, “खरं सांगायचं तर मला खूप हसायला आलं. हे चांगले आणि गोड लोक आहेत. चांगले कलाकार आहेत. पण जेव्हा सिबलिंग डिव्होर्सची बातमी समजली तेव्हा वाटलं की, लोकांच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकायला येत होत्या ते काही कमी आहे का की आता हे सिबलिंग डिव्होर्ससुद्धा होत आहेत. माझ्या आई-आजीला याबद्दल सांगितलं, तर त्या दोघींना कानाखाली देतील आणि एकाला एका कोपऱ्यात तर दुसऱ्याला दुसऱ्या कोपऱ्यात बसायला सांगतील. बोलायचं नसेल, तर बोलू नका; पण भांडायचं नाही, असं खडसावून सांगतील. असं होत नाही. सिबलिंग डिव्होर्स हा खूप मोठा शब्द आहे. ती त्यांच्या घरातील गोष्ट आहे, ती त्यांच्या घरापर्यंतच ठेवायला पाहिजे होती. बहीण-भाऊ आहेत. सोनू कक्करला काहीही मदत लागली, तर नेहा कक्कर तिच्या मदतीसाठी पळत येईल. आपण त्यांच्या घरातल्या गोष्टींबद्दल उगाचच चर्चा करीत आहोत. त्यांच्यातील भांडण मिटलं नाही, तर मी माझ्या आई आणि आजीला त्यांच्याकडे पाठवेन. दोघींचे कान पकडून त्या त्यांच्यातील भांडण सोडवतील आणि सांगतील की एकत्र राहा.

गोविंदाची मुलगी टीना आहुजा यावर म्हणाली, “मला भाऊ आहे, त्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजते. घरातल्या गोष्टी घरात राहिल्या, तर चांगल्या आहेत. त्यावर जास्त काही बोलू शकत नाही. भावा-बहि‍णींच्या नात्यात रुसवे-फुगवे होत असतात. त्याची काळजी करण्याची काही गरज नाही.” तर अभिनेत्री गौतमी कपूर म्हणाली, “ती त्यांच्या घरातील गोष्ट आहे. यावर सोशल मीडिया अथवा इतर कोणालाही त्यावर काहीच बोलण्याचा अधिकार नाही. घरातल्याच लोकांना घरातील गोष्टी माहीत असतात. त्यामुळे मला यावर काहीच कमेंट करायची नाही.”

सोनू कक्करने पोस्टमध्ये काय म्हटले होते?

सोनू कक्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनू कक्करने लिहिले, “तुम्हा सर्वांना कळविताना खूप दुःख होत आहे. यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. मी हा निर्णय भावनिक वेदनांतून घेतला आहे. आज मी खरोखरच निराश आहे”, असे लिहीत सोनू कक्करने नेहा व टोनी या तिच्या भावंडांशी संबंध तोडल्याचे जाहीर केले. तसेच ती दु:खी असल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. त्या पोस्टद्वारे सोनू कक्करने नेहा व टोनी या तिच्या भावंडांशी संबंध तोडल्याचे जाहीर केले. तसेच ती दु:खी असल्याचेही तिने या पोस्टमध्ये नमूद केले. आता ही पोस्ट तिने डिलीट केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सोनू कक्करने ‘लोरी सुना’, ‘लंडन ठुमकदा’, ‘जमाना बदल गया’, ‘बाबुजी जरा धीरे चलो’, ‘मदारी’ अशा अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. नेहा कक्कर काही दिवसांपासून मेलबर्नमधील तिच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत होती. आता सोनू कक्करच्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, नेहा किंवा टोनी यावर व्यक्त झाले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer sonu kakkar breaks ties with siblings shiv thakares reaction draws attention says i laughed so hard know what govindas daughter said nsp