Sohail Khan Share Family Photo : बॉलीवूडमधील कायम चर्चेत राहणाऱ्या कुटुंबापैकी एक म्हणजे खान कुटुंब. काही कार्यक्रमांना खान कुटुंबीय एकत्र आल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. तसंच अभिनेते सलमान, अरबाज आणि सोहेल आपल्या आई-वडिलांचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच सोहेल खानने शेअर केलेला फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोहेलने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये त्याची आई सलमा खान, सावत्र आई हेलन आणि वडील सलीम खान एकत्र बसलेले दिसत आहेत. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर काही वेळातच सोहेलने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
हा फोटो पाहून चाहत्यांना फार आनंद झाला आहे, कारण खान कुटुंबाचे असे काही प्रेमळ क्षण फार क्वचितच पाहायला मिळतात. सोहेलने शेअर केलेल्या या फोटोमधून सलमा, हेलन आणि सलीम खान यांच्या चेहऱ्यांवर एक प्रकारची सहजता दिसत आहे, यावरून त्यांच्या नात्यांतील समजूतदारपणा आणि सन्मानही जाणवत आहे.
पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “वेळेनुसार कुटुंब बदलू शकतं, पण त्यांच्यातील प्रेम आणि आदर कायम टिकून राहतो”, “या तिघांना असं एकत्र पाहून आनंद झाला”, “खूपच छान”, “कुटुंब हे केवळ रक्ताचं नातं नसतं, ते समजुतीनं आणि प्रेमानं निर्माण होतं”, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सोहेल खान इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, एक लग्न झालं असताना सलीम यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. हेलन आणि सलीम खान यांनी १९८० मध्ये लग्न केलं. सलीम यांचं आधीच लग्न झालं होतं. त्यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा अशी चार मुलं होती; तर हेलन आणि सलीम यांना अपत्य नाही, पण त्यांनी अर्पिताला दत्तक घेतलं होतं.
पतीनं दुसऱ्यांदा संसार थाटल्यानं सलमा खान नाराज झाल्या होता, पण आता खान कुटुंब एकत्र आहे. सलीम खान यांच्या कुटुंबाकडं आता एक आदर्श कुटुंब म्हणून पाहिलं जातं. सलमान खान आणि त्याच्या इतर भावंडांकडून आई सलमा खानप्रमाणेच हेलन यांचाही आदर केला जातो.