बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर ही नेहमीच तिच्या स्पष्ट विधानांसाठी आणि फॅशनसाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर बॉलीवूडपासून दूर आहे. आई झाल्यानंतर सोनमने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. सध्या ती तिचा वेळ मुलगा वायू आणि कुंटुबाला देत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियवर कायम सक्रिय असते.

आज सोनम तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते; पण एकेकाळी सोनमला तिच्या दिसण्यामुळे प्रचंड टीका व ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अभिनेत्रीला तिच्या वाढत्या वजनामुळे आणि चेहऱ्यावरील केसांमुळे लोकांकडून खूप टीका व ट्रोलिंग सहन करावे लागले होते. अभिनेत्रीने स्वतः एका मुलाखतीत तिच्या या वैद्यकीय स्थितीबद्दल सांगितलं होतं. तसंच तिने या वाईट काळात एका अभिनेत्रीकडून प्रेरणा घेतल्याचंही म्हटलं होतं.

सोनम १५-१६ वर्षांची असताना एका आजाराने ग्रासले होते. सोनमला पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) या हार्मोनल आजाराचं निदान झाले होते. या आजारामुळे तिचे वजन वाढले होते आणि चेहऱ्यावरील केसांचाही त्रास होत होता. सोनमने बरखा दत्तच्या मोजो स्टोरीमध्ये तिच्या लहानपणीच्या आजाराबद्दल आणि त्यामुळे सहन कराव्या लागलेल्या टीका व टोमण्यांबद्दल सांगितलं होतं.

याबद्दल अभिनेत्रीने म्हणाली होती, “जेव्हा मी १६ वर्षांची होते; तेव्हा माझे वजनही खूप वाढले. ही अशी वेळ होती जेव्हा मला सर्वात सुंदर दिसायचे होते; पण त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर केस होते आणि अनेक मुरुमदेखील होते. त्यावेळी लोक मला म्हणायचे की, ‘मी अनिल कपूरची मुलगी आहे’. त्यामुळे तेव्हा या सगळ्याचा मला धक्काच बसला होता.”

याबद्दल पुढे सोनमने असं सांगितलं होतं, “मला पीसीओएस नावाचा आजार होता. यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हा आईने मला काजोलचा फोटो दाखवत प्रोत्साहन दिलं होतं. काजोलच्या भुवयांमध्ये अंतर नव्हते आणि तिने कधीही तिच्या भुवया काढल्या नव्हत्या. तेव्हा माझी आई मला काजोलचा फोटो दाखवत म्हणाली होती, ‘ही आता मोठी नायिका आहे.”

९० च्या दशकात काजोलचा आत्मविश्वास आणि अभिनयाच्या क्षमतेमुळे कोणीही तिच्या भुवयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. काजोलने सोनमला खात्री दिली होती की, सौंदर्य हे फक्त तुमच्या मानण्यावर अवलंबून असतं. काजोलमुळे सोनमला मनोरंजन क्षेत्रात आणि आयुष्यात आवश्यक असलेला आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली होती.

दरम्यान, सोनमबद्दल सांगायचं झालं तर, तिने २००५ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. मग २००७ मध्ये आलेल्या ‘सावरिया’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर सोनम ‘सावरिया’, ‘रांझना’, ‘नीरजा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘प्रेम रतन धन पायो’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.