दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री म्हणजे मोहिनी. गेल्या अनेक वर्षांपासून त्या रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. तरी त्यांच्या भूमिकांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

सध्या अभिनयापासून दूर असलेल्या मोहिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील खडतर टप्प्याबद्दल सांगितलं. Cinema Vikatan या माध्यमाशी बोलताना त्यांनी मनात आत्महत्येचा विचार असल्याचं सांगितलं. याबद्दल त्या म्हणाल्या, “लग्नानंतर मी नवऱ्याबरोबर आणि मुलांबरोबर सुखाने संसार करत होते. काहीच कमी नव्हतं. तरीही अचानक नैराश्य यायला लागलं. हे का होतंय, काहीच कळत नव्हतं. एक वेळ अशी आली की, मी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, तोही एकदा नव्हे, तब्बल सात वेळा…”

तसंच पुढे ‘माझ्यावर काळी जादू केली गेली होती’ असा दावाही त्यांनी केला आहे. याचा अनुभव सांगत त्या म्हणाल्या, “तेव्हा एका ज्योतिषाने मला सांगितलं की, माझ्यावर कोणीतरी जादूटोणा (काळी जादू) केली आहे. मी सुरुवातीला हसले. पण नंतर विचार आला की, मी आत्महत्या करायचा विचार का केला? तेव्हा लक्षात आलं की, यात काहीतरी गंभीर आहे. त्या क्षणानंतर मी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला.”

यापुढे त्या सांगतात, “सगळं काही सुरळीत असूनही, माझ्या डोक्यात सतत फक्त मृत्यूचाच विचार येत होता. माझ्याबरोबर असं का घडतंय? हे सारखं वाटायचं. शेवटी समजलं की, माझी ही अवस्था माझ्या पतीच्या नात्यातील एका महिलेने केलेल्या काळ्या जादूमुळे झाली होती.”

दरम्यान, अभिनेत्री म्हणून २० वर्षांच्या कारकिर्दीत, मोहिनी यांनी शिवाजी गणेशन, एनटीआर, चिरंजीवी, मोहनलाल, ममूटी, शिवराजकुमार, विक्रम, विशाल, रविचंद्रन, मोहन बाबू, अक्षय कुमार, सुरेश गोपी, सरथकुमार, विजयकांत, विष्णुवर्धन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे.

तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतही अभिनय केलेल्या मोहिनी यांनी हिंदी सिनेमातही काम केलं आहे. १९९१ मधील ‘डान्सर’ या सिनेमामध्ये त्यांनी अक्षय कुमारबरोबर मुख्य भूमिका साकारली होती.