Subodh Bhave will play role of Saint Tukaram: अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या विविध धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत अभिनेत्याने चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुबोध भावेची ओळख आहे.

आता अभिनेता एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संत तुकाराम असे या चित्रपटाचे नाव आहे. सुबोध भावे यांच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. आता सुबोध भावे कोणत्या भूमिकेत दिसणार, चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करत आहेत आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेऊ…

सुबोध भावेने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेता संत तुकारामांच्या भूमिकेत दिसत आहे. तो पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तसेच गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावर नाम दिसत आहे. तसेच अभंग म्हणत असलेले संत तुकाराम दिसत आहेत. तसेच राम-कृष्ण हरी हे गाणे ऐकायला मिळत आहे.

आदित्य ओम यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यांनीच केले आहे. हा हिंदी चित्रपट आहे. तसेच, कर्जन फिल्म्स व पुरुषोत्तम स्टुडिओने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १७व्या शतकातील संत-कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि त्यांच्या भक्ती चळवळीवर आधारित आहे. तर चित्रपटाचे संगीत निखिल कामत, रवी त्रिपाठी आणि वीरल-लावण यांनी केले आहे.

सुबोध भावेसह कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार?

संत तुकाराम या चित्रपटात सुबोध भावेसह अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, शिव सूर्यवंशी, शीना चौहान, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, डीजे अकबर साम, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘संत तुकाराम’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

संत तुकाराम १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुबोध भावेने पोस्टर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे. तर एकाने राम-कृष्ण हरी असे लिहित चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सुबोध भावेच्या चित्रपटांबाबत बोलायचे तर आम्हीच असू लाडके, पुष्पक विमान, बालगंधर्व, लोकमान्य: एक युग पुरुष, आणि.. डॉक्टर काशिनाथ घाणेकर, चिंटू, हापूस, वाळवी, बस्ता, भयभीत, अलिबाबा आणि चाळिशीतले चोर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेली तुला पाहते रे ही मालिका मोठी गाजली होती. आता इतर चित्रपटांप्रमाणे संत तुकाराम या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.