गोविंदा मागील बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. १९९० च्या दशकातील एक मोठा स्टार असूनही, त्याला काम मिळत नाहीये. गोविंदाला कामाच्या चांगल्या ऑफर येत नसल्याने त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि त्यांची मुलं, यशवर्धन आणि टीना यांना काळजी वाटत आहे. एका मुलाखतीत, सुनीताने गोविंदाला मोठ्या पडद्यावर परतताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
झूमला दिलेल्या मुलाखतीत सुनीला म्हणाली, “मी नेहमीच गोविंदाला म्हणते की तू एक दिग्गज स्टार आहेस, ९० च्या दशकातील राजा आहेस. आजच्या पिढीतील मुले तुझ्या गाण्यांवर नाचतात. तुझ्यासारखा दिग्गज घरी का बसला आहे? तुझ्या वयाचे कलाकार अनिल कपूर, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ इतकं काम करत आहेत, तू का काम करत नाहीस? आम्ही गोविंदाला चित्रपटांमध्ये मिस करतोय.”
सुनीता पुढे म्हणाली, “मी आणि माझी मुलं त्याला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहोत. तू ज्या लोकांबरोबर, मित्रांबरोबर वेळ घालवत आहेस ते तुझ्यासाठी काय चांगलंय ते सांगत नाही. हो ला हो लावतात. ते तुझं चांगलं व्हावं असं इच्छित नाहीत. मला त्याच्या अशा मित्रांना एवढंच सांगायचंय की गोविंदा तुम्हाला आर्थिक मदत करतो, मग तुम्ही त्याला योग्य मार्ग का दाखवत नाही?”
गोविंदा घरी बसलाय याचं वाईट वाटतं – गोविंदा
गोविंदा अजुनही ९० च्या दशकात अडकून पडलाय, असं सुनीताने म्हटलं. “९० चं दशक गेलंय, हे २०२५ आहे. ९० च्या दशकात यायचे तसे चित्रपट आता कोणी पाहत नाही. पैशांसाठी त्याचं आयुष्य का बरबाद करत आहात? कोणीतरी त्याला वजन कमी करायला सांगा, जेणेकरून तो देखणा दिसेल. असा दिग्गज अभिनेता घरी बसलाय त्याचं आम्हाला वाईट वाटतंय. इंडस्ट्रीत सर्वांना त्यांची वाहवाही झालेली आवडतं, कोणाला सत्य ऐकायचं नाही. गोविंदासारखा दुसरा चांगला अभिनेता नाही, पण त्याने चांगले चित्रपट व चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला हवं. इथेच तो कमी पडतोय,” असं सुनीता म्हणाली.
सुनीताने ओटीटीवर काम करण्याचा सल्ला दिला पण…
“काही वर्षांपूर्वी मी गोविंदाचे काम सांभाळत होते. मी त्याला ओटीटी माध्यमात काम करण्याचा सल्ला दिला. एक चांगला विषय होता, पण त्याने नकार दिला. मी त्याला सांगितलं की ४-५ वर्षांनंतर लोक फक्त ओटीटी पाहतील. मी स्वतः ओटीटीवर दररोज वेगळ्या भाषेत चित्रपट पाहते. पण तो म्हणाला की त्याला फक्त मोठ्या पडद्यावर चित्रपट करायचे आहेत. मी आता त्याचे कामही सांभाळत नाही. ३८ वर्षे तुला सहन केलं, तू ऐकतच नाही. आता ज्यांचं ऐकतोय त्यांचं ऐकूनही करून बघ काही झालं तर,” असं सुनीता म्हणाली.