Sunjay Kapur Property Controversy: करिश्मा कपूरची मुलं समायरा व कियान यांनी सावत्र आई प्रिया सचदेवच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिवंगत वडील संजय कपूर यांच्या संपत्तीत वाटा मिळावा, यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. त्यानंतर संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रियाने दावा केला की समायरा व कियान या दोघांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतून १९०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. करिश्मा कपूरचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रियाच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रियाची ही सेटलमेंट अर्थहीन असल्याचं ते म्हणाले.
प्रिया सचदेवच्या वकिलांनी बुधवारी झालेल्या सुनावणीत दावा केला की करिश्मा आणि संजयची मुलं कियान व समायरा यांना मृत्युपत्रातून वगळण्यात आलेलं नाही. तसेच त्यांना संपत्तीतून १९०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पण करिश्माच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कायदेशीर टीमने युक्तिवाद केला की प्रियाचं संपत्तीवर नियंत्रण ठेवत असल्याने मुलांना १९०० कोटी रुपयांचा अॅक्सेस नाही.
करिश्माचे वकील प्रिया सचदेवच्या दाव्यावर काय म्हणाले?
आता करिश्माचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रिया सचदेवच्या १९०० कोटी रुपयांच्या दाव्यावर टीका केली आहे. रिपब्लिक टीव्हीवर बोलताना जेठमलानी म्हणाले, “जर संपत्ती ३०,००० कोटी रुपयांची असेल, तर त्यांना फक्त १९०० कोटी रुपये कसे मिळतील… संपत्तीत फक्त पाच जणांचा वाटा आहे. संजय कपूरची आई, त्यांची तीन अपत्ये आणि प्रिया सचदेव. प्रिया सचदेव संजय कपूर यांचं खरं मृत्यूपत्र का दाखवत नाही? मुलांवर प्रिया सचदेवने दया दाखवायची गरज नाही, कारण ही संजय कपूरची मालमत्ता आहे. कोणीही मुलांवर उपकार करत नाहीये. प्रिया सचदेव तिच्याकडे असलेली उर्वरित २८,००० कोटी रुपयांची मालमत्ता सोडून देणार आहे का? हा सगळा काय फालतूपणा सुरू आहे. आम्ही संजय कपूर यांच्या संपत्तीत त्यांच्या मुलांच्या वारसा हक्कासाठी लढण्याचा प्रयत्न करत आहोत.”
करिश्मा स्वतःसाठी पैसे मागत नाहीये
करिश्मा या खटल्यात तिच्या मुलांचे प्रतिनिधित्व करत आहे. ती स्वतःसाठी पैसे मागत नाहीये, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. “करिश्मा कपूरला स्वतःसाठी काहीही नकोय. हा खटला तिने मुलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी भरला आहे. कारण संजय कपूर यांनाही मुलांचे भविष्य सुरक्षित करायचे होते. संजय कपूर यांच्या मृत्युपत्रात त्यांची भारतातील संपत्ती, परदेशातील संपत्ती, त्यासंदर्भातील सर्व व्यवहारांची माहिती आहे, पण ते मृत्युपत्र अद्याप सर्वांसमोर उघड करण्यात आलेले नाही,” असं जेठमलानी यांनी नमूद केलं.
दरम्यान, संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यानंतर कुटुंबात त्यांच्या संपत्तीबद्दल वाद सुरू झाला आहे. करिश्माच्या दोन मुलांव्यतिरिक्त संजय कपूरच्या आईनेही सून प्रिया सचदेवविरोधात खटला दाखल केला आहे. कोर्टाने प्रियाला दिवंगत पतीच्या संपत्तीबद्दल सर्व तपशील उघड करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे.