Twinkle Khanna Dance On Madhuri Dixit Song : माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या प्रमुख महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘ठाणेदार’ हा सिनेमा १९९० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक होते बप्पी लहरी. ‘ठाणेदार’ सिनेमातील अनेक गाणी सर्वत्र लोकप्रिय ठरली होती. यातील अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरींनी गायलेलं “तम्मा तम्मा लोगे…” गाणं सर्वत्र विशेष लोकप्रिय ठरलं होतं. याच गाण्यावर आता जवळपास ३५ वर्षांनी अक्षय कुमारच्या पत्नीने ठेका धरला आहे.

लोकप्रिय अभिनेत्री व अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. यामध्ये ट्विंकल “तम्मा तम्मा लोगे…” गाण्याच्या हूक स्टेप्स रिक्रिएट करत त्यावर जबरदस्त एनर्जीने डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्यात ट्विंकलने या पोस्टला दिलेल्या हटके कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ट्विंकल खन्ना म्हणते, “मला वाटलं होतं की मी माधुरी दीक्षितसारखी नाचेन पण, शेवटी मी संजय दत्तप्रमाणे नाचताना दिसले. तळटीप – या डान्स स्टेप करताना माझा पाय फ्रॅक्चर झाला होता.” बायकोच्या या डान्स व्हिडीओवर अक्षय कुमारने “तुझं टॅलेंट-शंकास्पद, आत्मविश्वास – कोणालाही नष्ट करता येणार नाही असा, माझी पत्नी- अमूल्य ( Talent – questionable, Confidence – unshakable, Wife – priceless )” अशी हटके कमेंट केली आहे.

ट्विंकल खन्नाच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय स्पृहा जोशी, गुनीत मोंगा, दीपशिखा देशमुख, ताहिरा कश्यप या कलाकारांनी सुद्धा ट्विंकलच्या कॅप्शनचं विशेष कौतुक केलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. चालू घडामोडींवर ती नेहमीच स्वत:ची स्पष्ट मतं मांडत असते. अनेकदा तिची परखड मतं वादाचा विषय ठरतात. अभिनेत्री म्हणून ट्विंकलची कारकीर्द लहान असली तरी लेखिका म्हणून ती यशस्वी ठरली आहे.