Varun Dhawan and Janhvi Kapoor Dance Video : बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा आगामी सिनेमा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ येत्या २ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका आहे. रोमँटिक कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा आहे. प्रदर्शन जवळ आल्याने सर्वत्र सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच वरुण आणि जान्हवीदेखील जोरदार प्रमोशन करत आहेत.

टेलिव्हिजनवरील शो तसंच काही लाईव्ह कार्यक्रमांत जाऊनही वरुण-जान्हवी आपला सिनेमा प्रमोट करताना दिसत आहेत. अशातच त्यांनी नुकतीच एका दांडिया कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमात त्यांनी एका मराठी गाण्यावर डान्स केला.

वरुण-जान्हवी यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वरुण-जान्हवी यांनी या कार्यक्रमात चक्क एका मराठी गाण्यावर डान्स केला आणि हे गाणं होतं, ‘ढगाला लागली कळ’. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या गाण्यावर वरुण-जान्हवी यांनी डान्स केला. भर पावसात दोघे या गाण्यावर थिरकले. वरुण-जान्हवीसह अभिनेता मनीष पॉलही यावेळी त्यांच्यासह एन्जॉय करताना दिसला.

Instant Bollywood या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वरुण-जान्हवी यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मराठी गाण्यावरील बॉलीवूड कलाकारांचा हा डान्स पाहून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. हार्ट इमोजीद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा डान्स व्हिडीओ

दरम्यान, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास, हा सिनेमा २ तास १५ मिनिटांचा आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमांचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

वरुण धवन, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ आणि जान्हवी कपूर या कलाकारांबरोबरच सिनेमात अक्षय ओबेरॉय, अभिनव शर्मा, मनीष पॉल हे कलाकारही दिसणार आहेत. करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ अंतर्गत या सिनेमाची निर्मिती झाली आहे.