अभिनेता वत्सल सेठने २००४ मध्ये ‘टारझन-द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. टारझन चित्रपटमुळे वत्सल सेठला एक वेगळी ओळख मिळाली. यानंतर काही वर्ष छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्याने बहुचर्चित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात ‘इंद्रजीत’ ही भूमिका साकारली. ‘आदिपुरुष’ प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला होता. चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट निर्माण झाली होती. याबद्दल नुकत्याच ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत वत्सल सेठने भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “लोणावळ्याला थांबले म्हणून दुप्पट टोल?”, ऋजुता देशमुखने व्यक्त केला संताप; म्हणाली, “रितसर तक्रार केली पण…”

‘आदिपुरुष’ मधील काही संवाद आणि पात्रांचे लूक यामुळे चित्रपट बराच वादात सापडला होता. बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ला म्हणावे तसे यश मिळाले नाही याबाबत सांगताना वत्सल म्हणाला, “आदिपुरुषसाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती, इतकी मेहनत माझ्या इतर कोणत्याही प्रोजेक्टसाठी केली नव्हती. खास लूकसाठी मी दाढी वाढवली, अनेक कार्यशाळांमध्ये सहभागी झालो होतो.”

हेही वाचा : “एवढी शिस्त…”, प्रवीण तरडेंनी सांगितला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभव; म्हणाले, “७ च्या शिफ्टला पहाटे साडेतीनला…”

वत्सल पुढे म्हणाला, “इंद्रजीतच्या पात्रासाठी एवढी मेहनत घेतली होती की, त्या दरम्यान मी इतर कोणताही प्रकल्प हाती घेतला नव्हता. परंतु, पहिल्याच दिवसापासून चित्रपटाबद्दल प्रचंड नकारात्मकता पसरली. यामुळे माझे काही जवळचे नातेवाईक सुद्धा हा चित्रपट पाहायला गेले नव्हते. ‘आदिपुरुष’ पाहायला गेलो तर, चित्रपटगृहात मारहाण किंवा भांडणे होतील असा त्यांचा समज झाला होता.”

हेही वाचा : हर्षदा खानविलकरने केलं सुप्रिया पाठारे यांच्या लेकाच्या नवीन हॉटेलचं उद्घाटन, पदार्थांच्या चवीबद्दल म्हणाली…

“माझ्या आणखी काही मित्रांनी ‘आदिपुरुष’ पाहिला ते मला म्हणाले, चित्रपट एवढाही वाईट नाही. त्या भूमिकेसाठी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप प्रयत्न केले. पण, दुर्दैवाने काही गोष्टी जुळत नाहीत.” असे वत्सलने स्पष्ट केले. दरम्यान, अभिनेता लवकरच एका गुजराती चित्रपटात दिसणार आहे. यानिमित्ताने तो गुजराती कलाविश्वात पदार्पण करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vatsal sheth addresses adipurush failure says my close relatives did not go and watch sva 00