Vicky Kaushal’s father Sham Kaushal was Diagnosed with cancer : शाम कौशल हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अॅक्शन डिरेक्टर आहेत. १९८०-९०च्या काळात शाम कौशल यांनी अनेक चित्रपटांत अॅक्शन डिरेक्टर म्हणून काम केलं आहे. आजची तरुण पिढी त्यांना अभिनेता विकी कौशल व सनी कौशलचे वडील म्हणून ओळखतात. अशातच शाम यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
शाम कौशल यांनी अमन औजलाला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांना झालेल्या गंभीर आजाराबद्दल सांगितलं आहे. २००३ साली हृतिक रोशनच्या ‘लक्षया’ (Lakshya) या चित्रपटासाठी लद्दाख येथे चित्रीकरण करत असताना त्यांच्या पोटोत दुखत असल्याने त्यांना तेथील आर्मी रुगणालयामध्ये भर्ती करण्यात आलेलं. परंतु, त्यांनी त्यावेळी प्रकृतीकडे दुर्लक्ष करत श्याम बेनेगल यांच्या ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ या चित्रपटासाठी काम करण्यास सुरुवात केली.
या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, “२००३ साली मला कर्करोगाचं निदान झालं होतं, त्यामुळेच माझ्या पोटात दुखत असे. तेव्हा डॉक्टरांनी मला मी फार काळ जगणार नाही असं सांगितलेलं. मी बराच काळ याबाबत कोणालाही सांगितलं नाही, कारण मला काम मिळणार नाही याची भीती होती.”
शाम कौशल पुढे म्हणाले, “डॉक्टरांनी मला तेव्हा सांगितलेलं की तुला शस्त्रक्रिया करावी लागेल. मी त्यांना म्हटलं, जर हा त्यावर उपाय असेल तर मला हरकत नाही. त्यानंतर माझी शस्त्रक्रिया झाली. सलग तीन तास माझ्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. यानंतर शुद्धीवर यायला मला वेळ लागला. तीन दिवसांनंतर मी पूर्णपणे शुद्धीत आलो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मला असं जाणवलं की, तिथे असलेली डॉक्टरांची टीम काळजीत होती. माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी त्यातील काही भाग मला कर्करोगच आहे का हे जाणून घेण्यासाठी पुढे तपासणीसाठी पाठवलं, त्यातून समजलं मला कर्करोगच आहे.”
“तपासणीनंतर रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जगू शकत नाही. तेव्हा मी ज्या रुग्णालयाच्या इमारतीत दाखल होतो, त्याच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या विचारात होतो. मी भीतीपोटी हे करत नव्हतो तर मला अस जगायचं नव्हतं. जर मृत्यू होणार असेल तर तो लगेच व्हावा, असा त्रास नको एवढंच मला वाटत होतं.”
आयुष्यामध्ये अशा कठीण परिस्थितीत शाम कौशल यांनी देवाशी संवाद साधल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, “मी तेव्हा देवाशी संवाद साधायचो. मी म्हणायचो की, मला असं जगायचं नाहीये, जर तुला मी जगावं असं वाटत नसेल तर आताच मला मृत्यू येऊ देत. मी माझं आयुष्य जगलो आहे, पण जर तुला वाटत असेल की मी अजून काही काळ जगावं तर मला कृपा करून बरं कर आणि निदान अजून १० वर्षे जगू दे, कारण माझी मुलं अजून लहान आहेत.”
शाम कौशल याबाबत पुढे म्हणाले, “यानंतर माझी मृत्यूबद्दलची भीती नाहिशी झाली. दुसऱ्या दिवशी मी नवीन उमेदीने आयुष्याकडे पाहिलं आणि म्हटलं की कदाचित काही शस्त्रक्रियांनंतर मी बरा होऊ शकतो आणि पुन्हा आधीसारखं आयुष्य जगू शकतो. त्या प्रसंगानंतर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. पुढचं एक वर्ष माझ्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या. सुदैवाने कर्करोग माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरला नव्हता.”
शाम कौशल पुढे देवाबद्दल म्हणाले, “मी देवाला मला अजून १० वर्षे दे असं संगितलं होतं, पण आता या घटनेला २२ वर्षे झाली आहेत. त्या घटनेनं माझं आयुष्य बदललं. मी अनेक चांगल्या माणसांना भेटलो. मला चांगली कामं मिळत गेली. माझी मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं काम करत आहेत, माझीसुद्धा प्रगती झाली.”