अभिनेता विकी कौशल हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक चरित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे केवळ हिंदीतच नव्हे, तर मराठीसह इतर प्रादेशिक भाषांतही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. विकी हा त्याच्या कलाकृतींव्यतिरिक्त इतरांच्या चित्रपटांचेही वेळोवेळी कौतुक करीत असतो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये त्याचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. अशातच नुकतेच विकीने ‘एप्रिल मे ९९’ या मराठी चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.
विकीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट आज २३ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. विकी काल २२ मे रोजी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करीत म्हणाला, “हा एक खूप अप्रतिम मराठी चित्रपट उद्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर मला खूप आवडला. त्यामुळे बालपणातील उन्हाळ्याच्या सुट्यांमधील दिवस आठवले. मी लवकरच हा चित्रपट पाहणार आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.” यावेळी त्याने रोहन मापुस्कर व राजेश मापुस्कर यांनाही टॅग केलं आहे.
रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट आज २३ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर व साजिरी जोशी हे चौघे महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. साजिरी जोशी या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. साजिरी ही मराठमोळी अभिनेत्री ऋजुता देशमुखची मुलगी असून, ती आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे.
विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली स्टोरी ऋजुता देशमुख यांनीसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिपोस्ट केली आहे. ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांना विशेषत: शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांकरिता हा चित्रपट खास ठरणार आहे.