Vivek Agnihotri Talks About Financial Struggle : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या पत्नी अभिनेत्री व निर्मात्या पल्लवी जोशी यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. परंतु, या दोघांना हा चित्रपट बनवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याबद्दल विवेक यांनी स्वत: सांगितलं आहे.
५ सप्टेंबर रोजी विवेक व पल्लवी यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अशातच आता विवेक यांनी या चित्रपटानं चांगली कमाई करणं त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं आहे. तसेच या चित्रपटासाठी त्यांना कराव्या लागलेल्या आर्थिक तडजोडींचीही त्यांनी माहिती दिली आहे.
आमच्या चित्रपटाला कोणीही पाठिंबा दिला नाही – विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच ‘गलाटा’ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “माझ्यासाठी सर्वांत मोठं आव्हान होतं ते पैशांचं. शेवटपर्यंत कोणीही आमच्या चित्रपटाला पाठिंबा दिला नाही. आम्हाला मदत केली नाही. ‘द काश्मीर फाइल्स’मधून आम्हाला जे काही पैसे मिळाले, ते आम्ही ‘द बंगाल फाइल्स’साठी वापरले. मला माहीत नाही की, यानंतर आर्थिकदृष्ट्या माझं कसं होईल. आमची समस्या ही आहे की, आम्हाला जे बनवायचं असतं, त्याची किंमतच १०० कोटी असते आणि आमच्याकडे फार कमी पैसे असतात. त्यामुळे आम्हाला प्रत्येक बारीकसारीक खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो आणि फार उशीर न करता शूटिंग पूर्ण करावं लागतं.”
आर्थिकदृष्ट्या संघर्ष करतोय : विवेक अग्निहोत्री
विवेक यांनी २००५ साली ‘चॉकलेट’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘गोल’, ‘हेट स्टोरी’, ‘जिद’ यांसारखे सिनेमे केले. नंतर त्यांनी २०१६ साली ‘बुद्धा इन ए ट्रॅफिक जॅम’ हा चित्रपट बनवला आणि त्यानंतर त्यांनी ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. विवेक अग्निहोत्री याबद्दल म्हणाले, “मी जेव्हापासून चित्रपटांमधून समाजातील सत्य गोष्टींवर भाष्य करायला लागलो तेव्हापासून माझ्या चित्रपटांसाठी मला संघर्ष करावा लागला. मला ‘बुद्धा इन ए ट्रॅफिक जॅम’, ‘द ताश्कंद फाइल्स’ व ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांसाठी संघर्ष करावा लागला. आम्ही अजूनही आर्थिकदृष्ट्या संघर्ष करीत आहोत. आमची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. विमानाची तिकिटं खरेदी करण्यासाठी पैसे कसे जमवायचे याबद्दल आम्ही चर्चा करायचो.”
विवेक यांनी पुढे सांगितलं, “माझ्याकडे दोन पर्याय आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातून मला थोडी जरी पैशांची मदत मिळाली तरी मी दुसरा भाग बनवेन. आम्ही १५ कोटींच्या बजेटमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ बनवलेला. त्या चित्रपटातून आम्ही ३० कोटी कमावले. त्याच पैशांचा वापर आम्ही ‘द बंगाल फाइल्स’साठी केला. आम्ही हा चित्रपट बनवण्यासाठी काही पैसे उधार घेतले, जे अजूनही आम्हाला परत करायचे आहेत.”
दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटानं पहिल्या दिवशी १.७५ कोटी, तर दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी इतकी कमाई केली. या चित्रपटानं आतापर्यंत एकूण चार कोटींची कमाई केली आहे.’