अभिनेता शाहरुख खान व काजोल यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट एकत्र केला होता. त्यांच्या या चित्रपटाची ३० वर्षांनंतरी प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडते. तसेच खऱ्या आयुष्यात हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. काजोल व शाहरुख यांची मुलंही आता मोठी झाली असून तेही मित्र आहेत. शाहरुखचा मुलगा आर्यन आता दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय.

आर्यनच्या बॉलीवूड पदार्पणाची जोरदार चर्चा होत आहे. रितेश देशमुखसह अनेक सेलिब्रिटींनी आर्यनसाठी पोस्ट केल्या आहेत. सेलिब्रिटी व चाहते आर्यनला करिअरसाठी शुभेच्छा देत आहेत. याचदरम्यान काजोलने आर्यनबद्दल एक वक्तव्य केलं होतं, ते व्हायरल होत आहे. काजोलची लेक निसा व शाहरुखचा मुलगा आर्यनबद्दल करण जोहरने एक प्रश्न विचारला होता.

करणचा प्रश्न, काजोलचं उत्तर अन् शाहरुखची प्रतिक्रिया

एकदा करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये ‘कुछ कुछ होता है’चे स्टार्स म्हणजेच शाहरुख, काजोल आणि राणी यांनी हजेरी लावली होती. रॅपिड फायर राउंड दरम्यान करण जोहरने काजोलला आर्यन खान आणि निसा देवगणशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. जर, आर्यन खानने जर निसा देवगणला पळवून नेलं, तर तुझी प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न विचारल्यावर काजोलची प्रतिक्रिया खूपच मजेदार होती. हा रॅपिड फायर राउंड होता, त्यामुळे काजोलने पटकन प्रतिसाद दिला. पण गंमत म्हणजे करणने हा प्रश्न विचारल्यावर शाहरुख हसत होता.

काजोलने करणच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं. ‘मी म्हणेन… दिलवाले दुल्हे ले जायेंगे,’ असं म्हणत काजोल हसायला लागली. व शाहरुखही हसायला लागला. पण नंतर तो म्हणाला की, या गोष्टीचा विचार करूनही त्याला टेन्शन येत आहे. “मला फक्त याचा विचार करूनही टेन्शन येतंय की काजोलशी मुलांमुळे नातं जुळेल,” असं शाहरुख म्हणाला आणि त्यानंतर राणी, काजोल आणि करण जोहरही मोठ्याने हसले होते.

दरम्यान, शाहरुख खान व काजोल यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘ओम शांती ओम’, ‘दिलवाले’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.