Mumtaz on her husband: अभिनेत्री मुमताज या बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. कमी वयात त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. पण, तुम्हाला हे माहीत आहे का? यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्री मुमताज यांनी चित्रपटांत काम करणे सोडले.
मुमताज काय म्हणालेल्या?
हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यावेळी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी मुमताज एक होत्या. युगांडामधील उद्योगपती मधुर माधवानी यांच्याशी लग्न केल्यानंतर मुमताज यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. त्याबद्दल एका जुन्या मुलाखतीत मुमताज यांनी वक्तव्य केले होते.
‘ई-टाइम्स’शी मुमताज यांनी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणालेल्या, “मला वाटते प्रत्येक स्त्रीने एका विशिष्ट वयात लग्न केले पाहिजे. मला वाटले की, तीच योग्य वेळ होती. माझ्या काही समकालीन नायिकांनी लग्न केले होते. त्या आजही अविवाहित आहेत. मला अशी एक व्यक्ती भेटली होती, ज्याचे माझ्यावर प्रेम होते. त्यावेळी मी चित्रपटांनादेखील कंटाळले होते. त्यामुळे मी सिनेमातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
मुमताज यांनी असेही वक्तव्य केले होते की, माझ्या सासरच्या लोकांना मी काम करावे, असे वाटत नव्हते. त्या काळात मी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असूनही मी त्यांची ती इच्छा मान्य केली. विकी लालवानीशी संवाद साधताना मुमताज म्हणाल्या, “माझ्या लग्नाच्या वेळी माधवानी कुटुंबानं सांगितलं की, लग्नानंतर मी काम करू शकत नाही. त्यावेळी मी माझ्या प्रत्येक चित्रपटासाठी ७.५ लाख रुपये घेत होते. त्यावेळी इतके मानधन फार कमी कलाकार आकारत असत. पण, मी माझ्या सासरच्यांच्या इच्छेखातर करिअर सोडले.” ज्यावेळी मुमताज यांनी अभिनय क्षेत्र सोडले, त्यावेळी त्या फक्त २८ वर्षांच्या होत्या.
मुमताज असेही म्हणाल्या, “माझ्या कुटुंबाने मी अधिक पैसे कमवावे म्हणून माझ्यावर दबाव आणला नाही. ते स्वार्थी नव्हते. करोडो पैसे कमावणाऱ्या मुलीला त्यांनी मला जाऊ दिले, याबद्दल मी त्यांचा आदर करते.”
गुजराती असणाऱ्या माधवानी कुटुंबात लग्न केल्यानंतर अनेक नवनवीन पदार्थ शिकल्याचेदेखील मुमताज यांनी सांगितले. आज मी चांगला स्वयंपाक बनवू शकते, असेही मुमताज यांनी सांगितले. त्याबरोबरच मुलगी नताशाच्या जन्माआधी खूप गर्भपात झाल्याचेदेखील त्यांनी खुलाशात सांगितले. मुमताज म्हणाल्या, “गरोदरपणात मी सहा महिने अंथरुणाला खिळून होते. त्यामुळे माझी मुले माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.”
पण तुम्हाला माहीत आहे का? मुमताज यांचे लग्न एका कठीण टप्प्यातून गेले. त्यांच्या पतीचे एका दुसऱ्या एका महिलेबरोबर अफेअर चालू होते. मात्र, मुमताज यांनी त्यांच्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांनी हे लग्न टिकवण्याचा निर्णय घेतला. मुमतजा म्हणालेल्या, “अशा एका घटनेमुळे मी माझे लग्न मोडणार नव्हते. माझा नवरा फ्लर्ट करत नाही. तो एक देखणा आहे. त्याने चूक केली. त्याला सोडून देण्याऐवजी मी त्याच्या बाजूने उभे राहणे निवडले.”
पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणालेल्या, “माझ्या पतीने एकदाच अफेअर केले. अमेरिकेतील एका मुलीबरोबर त्याचे संबंध असल्याचे त्याने मान्य केले होते. पण, त्याने मला शब्द दिलेला की, तो मला कधीच सोडणार नाही. तो त्याच्या शब्दांशी प्रामाणिक राहिला. त्याचा मी आदर करते.”
पतीच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर मुमताज दुखावल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्या भारतात आल्या. मात्र, त्यावेळी त्यांना एकटे वाटत होते. याचदरम्यान, त्यांचेदेखील अल्प काळासाठी अफेअर असल्याचे त्यांनी कबूल केले होते. त्या म्हणालेल्या, “तुम्ही काट्यांमध्ये असता आणि तुमच्यासाठी कोणीतरी गुलाब घेऊन येते, त्यावेळी तुम्ही भावनांमध्ये वाहून जाता. पण, ते फार काही गंभीर नव्हते. तो तात्पुरता काळ होता, जे प्रकरण लगेचच संपले होते.”
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आंधियाँ’ चित्रपटाद्वारे मुमताज यांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर मुमताज मोठ्या पडद्यावर कधीही दिसल्या नाहीत.