Nana Patekar wife Neelkanti Patekar : नाना पाटेकर यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. नाना त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. नाना पाटेकरांच्या पत्नीचे नाव निलकांती पाटेकर आहे. नीलकांती अभिनेत्री आहेत, पूर्वी त्या बँकेत अधिकारी होत्या. नुकत्याच आलेल्या ‘छावा’ चित्रपटातही त्या झळकल्या.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

खरं तर नाना व निलकांती यांनी प्रेमविवाह केला होता, पण ते नंतर वेगळे राहू लागले. या जोडप्याला मल्हार नावाचा मुलगा आहे. मल्हार आईबरोबर राहायचा. नानांच्या आईदेखील सूनेबरोबर राहायच्या, नाना मात्र एकटेच वेगळे राहायचे. नाना यांनी स्वतः एका मुलाखतीत पत्नी व कुटुंबापासून वेगळं राहण्याचं कारण सांगितलं होतं. तसेच पत्नीबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दलही ते व्यक्त झाले होते.

नाना पाटेकर-निलकांती यांची पहिली भेट कुठे झाली होती?

नाना पाटेकर यांना द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत ‘तुम्ही निलकांती यांना केव्हा भेटला होतात? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकावेळी का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. नाना यांनी प्रश्नाचं उत्तर देताना पत्नीमुळेच इंडस्ट्रीत करिअर करू शकल्याचं विधान केलं होतं. ”हो. तेव्हाच भेटलो होतो. ती नाटकात काम करायची आणि बँकेत अधिकारी होती. आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरी फक्त १५०० मिळायचे. तिने मला म्हटलं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. यश मिळेल की नाही हे त्यावेळी माहीत नव्हतं,” असं नाना म्हणाले होते.

निलकांती पाटेकर व नाना पाटेकर (फोटो- फेसबूक)

मी वेगळा राहायचो – नाना पाटेकर

निलकांती यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं आणि त्यासाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी नाना पाटेकरांना नेहमीच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच नाना या क्षेत्रात करिअर करू शकले. निलकांती यांनी सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर एका चित्रपटात काम केलं होतं, पण नंतर मात्र अभिनय केला नाही. “मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार व निलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो,” असं नाना पाटेकर म्हणाले होते.

नाना पाटेकरांच्या लग्नाचा खर्च फक्त ७५० रुपये

नाना पाटेकर व निलकांती यांच्या लग्नाचा खर्च फक्त ७५० रुपये होता. ते पुण्याला हनिमूनसाठीही गेले होते. नाना पाटेकर व निलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. तो नानांबरोबर नाम फाउंडेशनची कामं करतो. त्याने ‘द लिटिल गॉडफादर’ चित्रपटात एक लहानशी भूमिका केली होती. ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ व ‘अब तक छप्पन’ या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When nana patekar thanked wife neelkanti patekar for supporting in career reveals why they live separate hrc