Actor Asrani Passed Away: ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं दिवाळीच्या दिवशी निधन झालं. गेल्या काही दिवसांत पंकज धीर, मधुमतीनंतर हा सिनेसृष्टीसाठी तिसरा धक्का आहे. असरानी यांनी सोमवारी, २० ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असरानी यांना नेमकं काय झालं होतं, त्यांच्यावर घाईत अंत्यसंस्कार का करण्यात आले, याबद्दल असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी माहिती दिली.

असरानी यांना १५-२० दिवसांपूर्वी अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असं बाबूभाई थीबा यांनी नवभारत टाईम्सशी बोलताना सांगितलं.

बाबूभाई म्हणाले, “१५-२० दिवसांपूर्वी त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, म्हणून त्यांना चार दिवसांपूर्वी आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचे निधन झाले.” असरानी यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरलं होतं.

दिवाळीच्या दिवशी रात्री ८ वाजता का केले अंत्यसंस्कार?

२० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान असरानी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार इतक्या घाईत का करण्यात आले असं विचारल्यावर बाबूभाई म्हणाले, “त्यांच्या पत्नीने मला म्हटलं की त्यांना याबद्दल कोणालाही सांगायचं नव्हतं. त्यांना शांततेत अंत्यसंस्कार व बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे कोणालाही काहीच सांगायचं नाही.”

असरानी यांची पत्नीबद्दल माहिती

असरानी यांनी अभिनेत्री मंजू बंसल यांच्याशी लग्न केलं होतं. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. १ जानेवारी १९४१ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे धडे घेतले. असरानी यांना लहानपणापासूनच अभिनय आणि चित्रपटांची आवड होती, म्हणून ते चित्रपट पाहण्यासाठी घरातून पळून जायचे.

असरानी यांनी त्यांच्या करिअरमध्ये ४०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या निधनाची बातमी आल्यावर अक्षय कुमारसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला व त्यांना श्रद्धांजली वाहिली.