टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फीमेल कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. विनोदी अभिनेत्री भारती सिंहने मनोरंजन विश्वात मोठं यश कमावलं आहे. आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या भारती सिंहचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहे.

भारतीने गेल्या एक वर्षात जवळपास १५ किलो वजन कमी केले आहे. याबाबत तिला अनेक प्रसारमाध्यमांनी विचारले असता ती म्हणाली, “हो माझे वजन आता ९१ वरुन ७६ किलो झाले आहे. एवढे किलो वजन कमी झाल्याचे समजल्यानंतर मी स्वत:च चकित झाली आहे. पण त्यासोबतच मला याचा आनंदही आहे. वजन कमी केल्यानंतर आता मला निरोगी आणि तंदुरुस्त वाटतं आहे. वजन कमी केल्यानंतर मला आता दम लागत नाही. तसेच शरीर हलकं हलकं झाल्यासारखं वाटतंय. विशेष म्हणजे यामुळे मला मधुमेह आणि दम्याचा त्रास कमी झाला आहे,” असे भारतीने सांगितले.


भारतीचा डाएट फंडा काय?

भारतीने लॉकडाऊन काळात स्वत:ला ‘फॅट टू फिट’ केले आहे. ती दररोज संध्याकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत काहीही खात नाही. मात्र दुपारी १२ नंतर ती अक्षरश: खाण्यावर तुटून पडते, असे तिने स्वत:च एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. “माझे शरीर संध्याकाळी सातनंतर काहीही अन्न स्विकारत नाही. मी वयाच्या ३०-३२ वर्षापर्यंत खूप खाल्ले आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान मी खाण्यावर कंट्रोल केला. कडक डाएट फॉलो केले आणि आता मात्र माझ्या शरीराला त्या डाएटची सवय झाली आहे,” असेही ती म्हणाली.


“मी आता एक चांगली मुलगी बनली आहे. लॉकडाऊनने मला खूप काही शिकवले आहे. यात कुटुंबाचे महत्त्व, स्वत:वर प्रेम करणे यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही असाल तर कुटुंब आहे आणि काम आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वत:वर प्रेम केले नाही, तर इतर कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही. स्वत:वर प्रेम केल्यानंतर फार मस्त वाटते. विशेष म्हणजे स्क्रीनवर स्वत:ला फिट बघताना फार आनंद होतो आणि गर्वही वाटतो,” असे भारतीने सांगितले.

दरम्यान एका स्टेज परफॉर्मन्सदरम्यान भारतीच्या वजनामुळे अनेकांनी तिची चेष्टा केली होती. मात्र तिने कधी या गोष्टींचा फार विचार केला नाही. त्या उलट अनेकदा ती स्वत:च स्वत:ला हत्तीचे पिल्लू, गेंड्याचे पिल्लू असे बोलायची. ज्यामुळे प्रेक्षक खळखळून हसायचे. विशेष म्हणजे यापूर्वी तिला ज्यांनी जाड म्हणून टोमणे मारलेत, आता तेच तिला फिट असल्याचे सांगतात. ज्यामुळे तिला फार आनंद होतो.

सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’ 

सध्या भारती‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना पाहायला मिळते. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.