काल मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे ‘वेव्हज समिट २०२५’चा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या शानदार सोहळ्याचं उद्घाटन झालं. ‘वेव्हज समिट २०२५’मध्ये भारतीय सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रजनीकांत, करण जोहर, मोहनलाल, चिरंजीवी, रणबीर कपूर, आलिया भट, हेमा मालिनी, दीपिका पादुकोणसह अनेक कलाकारांचा यात सहभाग होता.

दीपिका पादुकोण ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडेच दीपिकाने मुंबईतील ‘वेव्हज २०२५ समिट’मध्ये तिच्या पदार्पणाबद्दल सांगितले.

दीपिका पादुकोणने सांगितले की, “मला कधीच वाटले नाही की मी इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे.” ‘द जर्नी’ सत्रादरम्यान, करण जोहरने हिंदी चित्रपटसृष्टीतील आतले आणि बाहेरचे कलाकार हा मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी शाहरुख खानही तिथे उपस्थित होता.

दीपिका पादुकोण म्हणाली, “मी सुरुवात केली तेव्हा हे फक्त एक नवीन जग होते. मी बेंगळुरूची १६-१७ वर्षांची मुलगी होते आणि फराह खान मला चित्रपटात घेण्यास उत्सुक होती. त्यावेळी मी बेंगळुरू आणि मुंबई असा प्रवास करत होते. त्यांनी माझे ऑडिशनही घेतले नाही. मला आठवतंय की मी त्यांना एकदा भेटले होते.”

मला कधीच असं वाटलं नाही की मी इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे

“फराह खान म्हणाली, मला तू एकदा शाहरुखला भेटावे असे वाटते. त्यावेळी शाहरुख ऑस्ट्रेलियामध्ये ‘चक दे इंडिया’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. तो म्हणाला की तो परत आल्यावर आपण एक मीटिंग घेऊ. मी मॉडेल होते, त्याने माझे काही काम पाहिले होते, पण मला कधीच असं वाटलं नाही की मी इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे, जी नवीन इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”

दीपिका पादुकोणच्या ‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटाने तिला स्टार बनवले. शाहरुख खानने इंडस्ट्रीतील त्याच्या प्रवेशाबद्दल सांगितले. किंग खानने सांगितले की, “जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी इंडस्ट्रीच्या बाहेरचा आहे. मला वाटत होते की हे जग माझे आहे, ही जागा माझी आहे.”