Dhanashree Verma Reveals She Once Treated Ranbir Kapoor Teeth : क्रिकेटर युजवेंद्र चहलची एक्स पत्नी धनश्री वर्मा ही एक अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शक आहे. पण त्याआधी ती दंत चिकित्सक होती. धनश्रीने अलीकडेच फराह खानच्या व्लॉगमध्ये सांगितले की, अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शक होण्यापूर्वी ती दंत चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करायची. त्यावेळी तिने रणबीर कपूरच्या दातांवर उपचार केले होते.
फराह खान नुकतीच धनश्री वर्माच्या घरी स्वयंपाकी दिलीपबरोबर गेली होती. तेथे त्यांनी एकत्र जेवण बनवले आणि अनेक मनोरंजक किस्सेही शेअर केले. धनश्री वर्माने तिच्या कारकिर्दीच्या त्या टप्प्याबद्दल सांगितले, जेव्हा ती दंतचिकित्सा करीत होती आणि अभिनयाच्या जगापासून खूप दूर होती. त्यावेळी धनश्री वर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली.
धनश्री वर्माने रणबीर कपूरच्या दातांवर केलेले उपचार
धनश्री वर्मा म्हणाली, “मी तीन वर्षे प्रॅक्टिस केली. वांद्रे आणि लोखंडवाला येथे माझे क्लिनिक होते. टीव्हीवरील सर्व लोक तेथे येत असत. मी एकदा रणबीर कपूरवरही उपचार केले आहेत.” ते ऐकून फराहने विचारले, ‘तू त्याच्या तोंडात पाहिलंस का? कसं होतं ते? काही वेगळं होतं का?’ मग धनश्री म्हणाली, “ते माझं काम होतं. त्याचं तोंड खूप निरोगी आणि स्वच्छ होतं.”
धनश्री वर्मा मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेजमधून दंतचिकित्सा शिकली आणि नंतर तिने प्रॅक्टिस सुरू केली. मग ती एक नृत्यांगना बनली. वैद्यकीय क्षेत्र सोडून तिने पूर्णपणे शोबिझच्या जगात प्रवेश केला आणि ती एक प्रभावशाली व्यक्तीदेखील बनली.
धनश्री वर्माच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०२० मध्ये युजवेंद्र चहलशी लग्न केले आणि मार्च २०२५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. धनश्रीने सांगितले की, घटस्फोटानंतरही ती युजवेंद्रच्या संपर्कात आहे. ती त्याला मेसेज करीत राहते.
या शोमध्ये दिसणार धनश्री वर्मा
कामाबद्दल बोलायचे झाले तर, धनश्री वर्मा लवकरच ‘राईज अँड फॉल’ या नवीन रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे, जो ६ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रसारित होईल.