दीपिका कक्कर तिच्या आरोग्याबद्दल चाहत्यांना अपडेट देत राहते. काही काळापूर्वी दीपिकावर स्टेज २ लिव्हर कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली होती. सध्या दीपिका औषधे घेत आहे. पण, यादरम्यान तिला केस गळणे, चिंता, अल्सर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता दीपिकाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती टेबलावर हात ठेवून कॅमेऱ्याकडे पाहत आहे.
फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले, “तो दिवस ज्या दिवसांत उपचार खूप कठीण असतात आणि साध्या गोष्टीही जड वाटतात.” दीपिका दोन महिन्यांपासून तिला यकृताच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून तिचा प्रवास चाहत्यांबरोबर शेअर करीत आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती आणि चाहत्यांना तिच्या यकृताच्या कर्करोगाबद्दल सांगितले होते.
दीपिका कक्करने लिहिले होते, “तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, काही आठवड्यांपासून आमच्यासाठी खूप कठीण काळ होता. पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवल्यानंतर आम्हाला कळलं की, टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे आणि नंतर आम्हाला कळले की, ट्यूमर कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. हा आमच्यासाठी खूप कठीण काळ होता.” दीपिकावर १४ तासांची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर दीपिका आता घरी आहे आणि तिने सांगितले की, तिचे पुढील महिन्यात स्कॅन होईल, ज्याबद्दल ती खूप घाबरली आहे. दीपिकाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची कुकिंग शो सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये दिसली होती.
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला ट्यूमर झाल्याच्या बातम्यांनी सगळेच हादरले होते, तिनेच याबद्दल माहिती दिली होती. मात्र, जूनमध्ये तिच्या लिव्हरमधून कर्करोगाचा ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर तिला दीड वर्ष उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. दीपिकाचा पती व अभिनेता शोएब इब्राहिमने एका व्लॉगमध्ये खुलासा केला होता की, तिचा ट्यूमर पुन्हा येण्याचा धोका जास्त आहे. म्हणून डॉक्टरांनी तिला एक वर्षापेक्षा जास्त काळ उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.
गेल्या महिन्यात दीपिकाने टार्गेटेड थेरपी सुरू केली आणि पहिला महिना पूर्ण झाल्यानंतर तिने एका नव्या व्लॉगमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत. मात्र, या थेरपीनंतर तिला केसगळती, अल्सर व शरीरावर पुरळ येणं अशा अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे, असे तिने सांगितले.