Disha Vakani at Lalbaugcha Raja Darshan : गणेशोत्सवामुळे संपूर्ण वातावरण आनंददायी झालं आहे. सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक सेलिब्रिटी जात असतात. यंदाही पहिल्या दिवसापासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सेलिब्रिटी राजाच्या दरबारात हजर होते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री दिशा वकानी हिनेही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
दिशा वकानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यादरम्यान ती मास्कने चेहरा लपवताना दिसली. यावेळी दिशा वकानी गुलाबी साडीत दिसली. तिने नाकात नथ, केसात गजरा आणि मोत्यांचे दागिने देखील घातले होते. या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती. चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत.
दिशा वकानी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती दयाबेनच्या भूमिकेत होती. तिने अनेक वर्षे या शोमध्ये काम केले. पण आता ती ७-८ वर्षांपासून शोमध्ये दिसलेली नाही. प्रसूती रजेमुळे तिने कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती शोमध्ये परतली नाही. शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेसाठी दिशाची जागा आतापर्यंत कोणीही घेतलेली नाही.
चाहते सतत दिशाला शोमध्ये पाहण्याची मागणी करत आहेत. निर्माते म्हणतात की ते ‘दयाबेन’ला शोमध्ये आणतील. त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. या वर्षी राखीच्या दिवशी, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी दिशा वकानीच्या घरी राखी बांधण्यासाठी गेले होते. असित मोदी यांनी दिशाबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये दिशा त्यांना राखी बांधताना दिसली. त्यांच्या राखी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
दिशाला दोन मुलं असून ती सध्या तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रीत करत आहे. ती मालिकेत परत कधी येणार, याची सतत विचारणा चाहत्यांकडून होत असते. दिशाचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल येणे असो वा मालिका सोडलेल्या कलाकारांनी शोबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे या कार्यक्रमाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोची ओळख आहे.
