Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin: प्रतीक गांधी आणि पत्रलेखा राव यांच्या ‘फुले’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने उडी घेतली. चित्रपटाचे प्रदर्शन रोखल्याबद्दल अनुराग कश्यपने संताप व्यक्त केला. या चित्रपटामुळे जातीय तणाव निर्माण होईल, असा आरोप केला जात आहे. सेन्सॉर बोर्डाने काही दृश्यांवर कात्री चालविण्याचे निर्देश दिले आहेत. याबद्दल संताप व्यक्त करणारी एक पोस्ट अनुराग कश्यपने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. या पोस्टनंतर त्याने ब्राह्मण समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान केले. ज्यावर आता वाद उद्भवला आहे.
वादानंतर दिलगिरी व्यक्त
अनुराग कश्यपने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत फुले चित्रपटाचे समर्थन केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर टीका केली होती. या पोस्ट खाली आलेल्या एका कमेंटला उत्तर देत असताना अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानाचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर चहुबाजूंनी टीका व्हायला लागली.
टीकेचा भडिमार आणि अनेकांनी कुटुंबियांच्या नावे धमकी दिल्यानतंर आता अनुराग कश्यपने दिलगिरी व्यक्त केली आहे. यासाठी पुन्हा एक पोस्ट टाकून टीका करणाऱ्यांना त्याने सुनावले आहे.
मी माफी मागतो पण…
अनुराग कश्यपने लिहिले, “मी माफी मागतो पण माझ्या पोस्टसाठी नाही, तर जी एक ओळ लिहिली होती. ज्याला चुकीच्या पद्धतीने घेतले जात असून त्यावरून द्वेष पसरवला जात आहे. कुटुंब, मित्र, मुलगी आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेपेक्षा कोणतेही भाषण किंवा कृती मोठी नाही. त्यांना बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. जे स्वतःला संस्कारी म्हणतात, तेच लोक अशा धमक्या देत आहेत. मी जे बोललो ते शब्द मागे घेऊ शकत नाही. मला शिव्या द्यायच्या असतील तर द्या. माझ्याकडून माफीची अपेक्षा असेल तर माफी मागतो. पण ब्राह्मण लोकांनो महिलांना सोडा. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात हे ठरवा.”
मुंबईत गुन्हा दाखल
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या वादग्रस्त विधानानंतर त्याच्याविरोधात मुंबईतील वकिलाने एफआयआर दाखल केला आहे. वकील आशुतोष दुबे यांनी याची माहिती त्यांच्या एक्स खात्यावर पोस्टद्वारे दिली. “अनुराग कश्यपने जातीबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधान केले आहे. द्वेष पसरविणाऱ्या या विधानांना समाज सहन करणार नाही”, अशी प्रतिक्रिया दुबे यांनी दिली आहे.