सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांची ही उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली आहे. ‘क्यूट’ अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगण स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालीय. लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं एक गाणं आणि छोट्या भागाची शूटिंग राहिलं होतं. अनलॉकनंतर या चित्रपटाच्या उरलेल्या शूटिंगला सुरवात करण्यात आली होती. ती आता पूर्ण झाली असून हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झालाय. याबाबत अभिनेत्री आलिया भट्टने स्वतः ही माहिती दिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटोज शेअर करून ही माहिती दिलीय. हे फोटो शेअर करताना आलियाने लिहिलं, “८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात केली होती. त्यानंतर २ वर्षांनी आम्ही या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केलीय. या चित्रपटाने दोन लॉकडाउन, दोन चक्रीवादळ आणि बऱ्याच समस्यांचा सामना केलाय. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही.”
अभिनेत्री आलिया भट्टला करोना झाल्यानंतर या चित्रपटाची शूटिंग ठप्प झाली होती. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. पण अखेर आज या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रिलीजसाठी सज्ज झालाय.
संजय लीली भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट मुंबईतली ‘माफिया क्वीन’ गंगूबाई काठियावाडी हिच्यावर आधारित आहे. गंगूबाई काठियावाडी ही आधी एक सेक्स वर्कर होती, त्यानंतर ती अंडरवर्ल्ड डॉन बनली.
शूटिंग संपताच पुढच्या प्रोजेक्टसाठी केली सुरवात
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासाठी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणं काही सोपं नव्हतं. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या आराम करण्याच्या मूडमध्ये बिलकुल नाहीत. लवकरच ते त्यांचा पुढचा प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. ज्या ठिकाणी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा सेट लागला होता, त्याच ठिकाणी ते नवी वेब सीरिज ‘हीरा मंडी’ साठी काम सुरू करणार आहेत.
‘हीरा मंडी’ लवकर सुरू करणार शूटिंग
‘गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवरच नवी वेब सीरिज ‘हीरा मंडी’ साठी शूटिंग सुरू करणार असले तरी, त्या सेटवर थोडे फार बदल करण्यात येणार आहेत. या सेटवर थोड्या फार बदलांचे काम पूर्ण झाल्यानंतर ‘हीरा मंडी’ वेब सीरिजसाठी कॅमेरा ऑन करण्यात येणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शक विभु पुरी असणार आहेत, तर संजय लीला भन्साळी याची निर्मीती करणार आहेत.
संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट येत्या ३० जुलैला प्रदर्शित करण्यात येईल. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले आहेत.