लोकसत्ता प्रतिनिधी
दरवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मोठमोठे हॉलीवूडपट आपल्याकडे प्रदर्शित होतात. यंदा मे महिन्यापेक्षा जुलै महिन्यात सगळ्या महत्त्वाच्या शृंखला हॉलीवूडपटांची एकच गर्दी झाली. आणि कधी नव्हे ते सुपरहिरोपटांचे चित्रपट आणि गाजलेल्या चित्रपट मालिकांबरोबरच हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता ब्रॅड पीट याची मुख्य भूमिका असलेल्या ‘एफ १ : द मुव्ही’ सारख्या पूर्णत: नव्या चित्रपटालाही भारतीय प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या चित्रपटाने भारतात आत्तापर्यंत ७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकंदरीतच मे महिन्यापासून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हिंदीपेक्षा हॉलीवूडपटांचाच तिकीट खिडकीवर वरचष्मा राहिला आहे.
एप्रिल – मे महिन्यातील शाळेच्या सुट्ट्या लक्षात घेत दरवर्षी हिंदी आणि हॉलीवूडमधील नामांकित चित्रपटांची या दोन महिन्यांत प्रदर्शनासाठी अधिक गर्दी असते.
यावर्षी मे महिन्यात एकही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मात्र, या सुट्टीतील मनोरंजनाची कसर १७ मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मिशन इम्पॉसिबल : द फायनल रेकनिंग’ या हॉलीवूडपटाने भरून काढली. हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरातून १२० कोटी रुपयांची कमाई केली. जून महिन्यात ‘हाऊसफुल ५’ वगळता कुठलाही मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. याच महिन्याच्या शेवटी शेवटी ब्रॅड पीटचा ‘एफ १ : द मुव्ही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि कुठलाही सिक्वेल, प्रीक्वेल नसलेल्या या चित्रपटाने अनपेक्षितपणे चांगली कमाई करत चित्रपटगृह व्यावसायिकांना सुखद धक्का दिला.
जुलै महिन्यात तर रांगेने नामांकित हॉलीवूडपट प्रदर्शित होणार होते, त्याच वेळी हिंदीत अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनों…’ हा एकच मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे या महिन्यात हॉलीवूडपटांचा दबदबा असणार हे निश्चित होतेच. पण या चित्रपटांनी चांगली कमाई करत तिकीट खिडकीवरचा वरचष्मा कायमही राखला आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऑरमॅक्सच्या अहवालातही जानेवारी ते मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी केलेल्या एकूण आर्थिक कमाईत हॉलीवूडपटांचा वाटा ८ टक्के असल्याचे नमूद केले आहे. त्यात जून आणि जुलै महिन्यात तर सलग तीन हॉलीवूडपटांनी चांगले आर्थिक यश मिळवले आहे. जुलै महिन्याची सुरुवात करणाऱ्या ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ या ज्युरासिक वर्ल्ड चित्रपट शृंखलेतील चौथ्या चित्रपटाने पहिल्या १२ दिवसांतच ७८ कोटी रुपये कमाई केली. हॉलीवूड अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची कमाई भारतात शंभर कोटी रुपयांपार गेली आहे. त्यामुळे यावर्षी भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलीवूडपटांमध्ये या चित्रपटाने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’चे गारूड अजूनही प्रेक्षकांच्या मनावरून उतरलेले नाही हेच या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येते. गेल्या आठवड्यात डीसीच्या सुपरहिरोपटांमधील महत्त्वाचा चित्रपट ‘सुपरमॅन’ प्रदर्शित झाला. जेम्स गन लिखित, दिग्दर्शित ‘सुपरमॅन’ या चित्रपटात अभिनेता डेव्हिड कोरेनस्वेट याने पहिल्यांदाच सुपरमॅनची भूमिका साकारली आहे. नव्या संचातील कलाकारांना घेऊन केलेला हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटानेही देशभरातून ४२ कोटींची कमाई केली असून लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करेल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे. लागोपाठ तीन हॉलीवूडपटांना मिळालेल्या विक्रमी यशाने भारतीय चित्रपट व्यवसायाला या दोन महिन्यांत चांगलाच आधार मिळाला आहे. ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनीही या तीन हॉलीवूडपटांना मिळालेल्या विक्रमी यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हॉलीवूडपटांचा जुलै महिन्यातला करिश्मा अजून सुरूच राहणार आहे. पुढच्या आठवड्यात मार्व्हलचा नवाकोरा ‘द फॅन्टॅस्टिक फोर : फर्स्ट स्टेप्स’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच मार्व्हलप्रेमींमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे नव्या कलाकारांना घेऊन सुरू केलेल्या ‘द फॅन्टॅस्टिक फोर’चं नवं पर्व कसं असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येणार यात चित्रपट व्यावसायिकांनाही शंका नाही. त्यामुळे जुलै महिन्यात प्रदर्शित झालेल्या याही चित्रपटाला यश मिळाले तर विक्रमी कमाई करणारा हा चौथा हॉलीवूडपट ठरेल. एकंदरीत या जुलै महिन्यात हॉलीवूडपटांनी आपला वरचष्मा कायम राखला असे म्हणता येईल.