सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अखेर पार पडला. मात्र या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक घटनाही पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात हात उचलला. या घटनेनंतर याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. यात त्याने मी त्यावेळी चुकीचा वागलो, असेही म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विल स्मिथने अवघ्या काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे विल स्मिथने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. यावर विल स्मिथ म्हणाला, “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील मी केलेले वर्तन हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझी मस्करी करणं किंवा माझ्या कामाची खिल्ली उडवणं ठीक होतं पण जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवल्यानंतर सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.”

कानशिलात लगावल्यानं विल स्मिथचा ऑस्कर होणार रद्द? जाणून घ्या अकादमीचा नियम काय?

“क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित असलेल्या व्यक्तींची आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या किंग रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग लागला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असे विल स्मिथ म्हणाला.

विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होतानाही दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर क्रिसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याची ही पोस्ट अनेक सेलिब्रिटींना लाईक केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा काल (२८ मार्च) आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर हात उचलल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली.

Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘डय़ून’ चित्रपटाला ६ ऑस्कर, कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मात्र भंगले

सुरुवातीला चाहत्यांना वाटले की हे सर्व शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे. पण नंतर काही व्हिडीओ आले ज्यात विलही रडताना दिसत होता, ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली की हे सर्व खरोखरच घडले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथला त्याचा ऑस्कर पुरस्कार परत करावा लागू शकतो, अशीही चर्चा रंगली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was wrong will smith public apology to chris rock over oscars slap nrp