Met Gala 2025 Isha Ambani Stylish Look : रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची संचालक ईशा अंबानी सध्या तिच्या ‘मेट गाला’ लूकमुळे चर्चेत आली आहे. डिझायनर अनामिका खन्नाने डिझाईन केलेल्या स्टायलिश आऊटफिटमध्ये ईशाने ‘Met Gala’ च्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. सध्या ईशाचे ‘मेट गाला’ सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुंदर असं भरतकाम केलेला पांढऱ्या रंगाचा कॉर्सेट कोट आणि काळ्या रंगाची टेलर ट्राउझर या लूकमध्ये ईशा प्रचंड स्टायलिश दिसत होती. यावर तिने घातलेल्या सुंदर अशा ज्वेलरीमुळे ईशाचा लूक परिपूर्ण आणि सर्वत्र लक्षवेधी ठरला.

ईशाने तिच्या स्टायलिश लूकवर सगळे खरे आणि तिची आई नीता अंबानींचे दागिने घातले होते. रेड कार्पेट लूकमध्ये तिने कानातले घातले नव्हते, पण ईशाने अनेक सुंदर नेकपीस आणि अंगठ्या घातल्या होत्या.

ईशाने ‘मेट गाला २०२५’ रेड कार्पेटवर तिच्या आईचा हिऱ्यांचा हार घातला होता. त्याची किंमत कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. ईशा म्हणते, “मी माझ्या आईचा हार आज घातला आहे. याशिवाय हातातील या अंगठ्या आणि कमरेभोवती लटकवलेला चाव्यांचा गुच्छ देखील माझ्या आईचा आहे.”

ईशाने या सोहळ्यासाठी खास नीता अंबानीचा १३६ कॅरेट हिऱ्यांचा हार घातला होता. ईशाचा हा ड्रेस डिझाईन करण्यासाठी तब्बल २० हजार तासांहून अधिक वेळ लागला आहे. स्टारलिश लूक करून ईशाने केसांची वेणी घालून एकदम देसी हेअरस्टाइल केली होती. तर, रेड कार्पेटवर एन्ट्री घेताना तिने कमीत कमी मेकअप केल्याचं पाहायला मिळालं.

ईशाने २०१७ मध्ये पहिल्यांदा मेट गालावर एन्ट्री घेतली होती. यानंतर ती २०१९ मध्ये पुन्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती. गेल्यावर्षी पार पडलेल्या ‘मेट गाला’साठी तिने राहुल मिश्राने डिझाईन केलेला फ्लोरल गाऊन घातला होता. तर, २०२३ मध्ये ईशासाठी प्रबल गुरुंगने खास आऊटफिट डिझाईन केला होता.

दरम्यान, ‘मेट गाला २०२५’ हा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला ईशासह शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.