‘बिग बॉस ३’ ओटीटीचं सूत्रसंचालन सलमान खानऐवजी प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर करणार हे जाहीर झाल्यानंतर चर्चांना एकच उधाण आलं. अनिल कपूर यांनी अभिनेता म्हणून एक काळ गाजवला आहेच, पण आत्ताही नव्या कलाकारांबरोबर काम करताना त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचा अभिनय, स्टाइल कुठेही ते कमी पडत नाहीत. किंबहुना, त्यांच्या या झक्कास स्टाइलबाज व्यक्तिमत्त्वाची अधिक चर्चा होते. या शोच्या निमित्ताने सलमान खानची जागा तुम्ही घेतली आहे, असं कोणी म्हटलेलं त्यांना फारसं रुचत नाही. एखाद्याची जागा घेणं वगैरे गोष्टी चुकीच्या आहेत, असं ते म्हणतात. आणि सलमानविषयी बोलायचं तर त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, इतकं बोलून न थांबता अनिल कपूरची जागाही कोणी घेऊ शकत नाही, असं ठामपणे सांगून ते आपली धमक दाखवून देतात. ‘बिग बॉस ३’च्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नव्या भूमिकेच्या तयारीत आहोत, असं त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितलं.

मलाच त्यांनी का निवडलं?

‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोसाठी होकार देण्यामागे काय विचार होता? असं त्यांना विचारल्यावर ते मला त्यांनी सूत्रसंचालक म्हणून निवडलं याचंच आश्चर्य वाटल्याचं सांगतात. माझ्यापेक्षा हुशार, सक्षम कलावंत मंडळी असताना त्यांनी ‘बिग बॉस’चा सूत्रसंचालक म्हणून माझी निवड का केली असेल? अशी एक उत्सुकता माझ्या मनात होती. त्यामुळे मीच का? असा प्रतिप्रश्न मी त्यांना पहिल्यांदा केला होता, असं म्हणताना मला स्वत:चं कौतुक ऐकायलाही फार आवडतं असं मिश्कीलपणे अनिल कपूर सांगतात. ‘बिग बॉस’च्या आयोजकांनी आपल्याला का निवडलं याचं कवतिक त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतरच आपण शोचा सूत्रसंचालक म्हणून पुढच्या तयारीला सुरुवात केली, असं झक्कास स्टाइलमध्ये त्यांनी सांगितलं. कोणतीही नवीन गोष्ट माझ्याकडे आली की माझ्यात उत्साह संचारतोच. त्यामुळे या भूमिकेमुळे मी खूप आनंदी आहेच आणि कधी केलं नाही आहे तर करून पाहूयाची उत्सुकताही मनात आहे, असं ते म्हणतात.

हेही वाचा >>>वेगळ्या विषयाची रंजक मांडणी

माझी तयारी

‘सलमानमुळे बिग बॉसच्या शोविषयी काही एक कल्पना असली तरी तयारीसाठी म्हणून मी या शोच्या आत्तापर्यंतच्या पर्वातील काही भाग पाहिले, अभ्यासले. त्यात सलमानबरोबरच एक पर्व महानायक अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. त्याचेही भाग पाहिले. बिग बॉसच नव्हे तर जगभरात असे कित्येक रिअॅलिटी शो गाजलेले आहेत त्याचेही संदर्भ घेतले. शिवाय, या शोच्या आधीच्या पर्वातील काही विजेत्यांना भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेता आल्या. माझ्या पद्धतीने मी या शोसाठी पूर्वतयारी केली आहे’ असं त्यांनी सांगितलं.

आव्हानात्मक भूमिकांबद्दल समाधान

‘चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे? पटकथा काय आहे? कशा पद्धतीची तिची मांडणी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, त्याने फार फरक पडतो. या गोष्टी जुळून आल्या आणि तुमची मेहनत त्याच्याशी जोडली गेली की त्यातून एक उत्तम कलाकृती उभी राहते’ असं मत त्यांनी मांडलं. गेल्या वर्षभरात गाजलेले त्यांच्या ‘फायटर’, ‘अॅनिमल’सारख्या चित्रपटांच्या बाबतीत निर्माते, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञान सगळ्यांनीच घेतलेली अपार मेहनत फळाला आली, असं ते म्हणतात. आत्ता वयाच्या या टप्प्यावरही चित्रपटकर्मी आपल्याकडे नवीन, आव्हानात्मक भूमिका घेऊन येतात याबद्दल समाधानी आणि कृतज्ञ असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

तुमची निवड महत्त्वाची…

‘तुम्ही कुठल्या प्रकारचे चित्रपट करता? दिग्दर्शक निवडता, काय पद्धतीने कामाची निवड करता यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. अनेक कलाकार, चित्रपटकर्मी खूप हुशार, बुद्धिमान आहेत. ते यशस्वी आहेत. तरीही या क्षेत्रात दीर्घकाळ टिकायचं असेल तर आपल्या कारकीर्दीत काय निवड करता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते ठरवून करावं लागतं’ असे अनुभवाचे बोल त्यांनी सांगितले. चित्रपटाबरोबरच ओटीटीसारख्या नव्या माध्यमात काम करताना माझ्यापेक्षा ज्यांची विचार करण्याची पद्धत चांगली आहे त्यांच्याबरोबर काम करण्यावर मी अधिक भर देतो. नव्या पिढीबरोबर काम करताना त्यांचे नवे विचार आणि तुमचे अनुभव याचं अफलातून मिश्रण कलाकृती उत्तम साकारण्यासाठी खूप कामी येतं, असं ते म्हणतात.

‘ईश्वर’, ‘राम लखन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘१९४२ लव्हस्टोरी’, ‘लम्हे’, ‘नायक’, ‘दिल धडकने दो’ ते अगदी माझ्या अलीकडच्या हरएक चित्रपटापर्यंत मी ज्या भूमिका केल्या किंवा जे निवडक चित्रपट केले ते सर्वोत्तम असेच होते. त्यामुळे अगदी पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतील हे मी विश्वासाने सांगतो. आणि म्हणून तुमची निवड तुमच्या कामात खूप महत्त्वाची ठरते हे पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित करू इच्छितो, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. सध्या ‘बिग बॉस ३’वर अनिल कपूर यांनी लक्ष केंद्रित केलं असलं तरी त्यांच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटातील त्यांच्या लुकसह नव्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘बिग बॉस’च्या शोमध्ये मी अनेकदा चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी गेलेलो आहे. सेटवर सलमानबरोबर वेळ घालवलेला आहे, त्यामुळे काय सुरू असतं तिथे याची थोडीबहुत कल्पना मला होतीच. आणि सलमानबरोबर माझी घट्ट मैत्री आहे. मी कधीही त्याला लहान भावासारखं वागवलेलं नाही की त्याने कधी मला मी त्याच्यापेक्षा मोठा आहे हे जाणवू दिलं नाही. या क्षेत्रात तुम्ही खूप लोकांबरोबर काम करता, पण प्रत्येकाबरोबर तुमच्या मनाची तार जोडली जातेच असं नाही. सलमानच्या बाबतीत आमच्या दोघांची मनं आधी जुळली. आम्ही दोघं समवयस्कांप्रमाणेच एकमेकांशी बोलतो, वागतो. हा शो मी करणार आहे हे ऐकून तो आनंदित झाला, मी त्याच्याशी याबद्दल गप्पाही मारल्या.-अनिल कपूर

ठाम आणि न्याय्य भूमिका असली पाहिजे

बिग बॉस’च्या घरातली भांडणं सोडवताना सूत्रसंचालकाचा कस लागतो. त्याची भूमिका यात महत्त्वाची असते, त्यामुळे मुळात घरात घडणारी भांडणं कशातून येतात, याचा विचार केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुणदोष असतात. एखाद्या व्यक्तीवर जेव्हा खूप दबाव येतो तेव्हा त्याच्या मनात भावभावनांचा कल्लोळ उठतो. त्याच्या मूळ स्वभावासह काही गोष्टी उफाळून येतात. या शोमध्ये स्पर्धकांच्या बाबतीतही हे घडतं आणि त्यातून मग वादविवाद होतात. काही विचित्र घटना घडतात. अशा वेळी त्या स्पर्धकाविषयी तुम्हाला माणूस म्हणून दयाही वाटत असते, पण त्याच वेळी या शोची शिस्त अबाधित ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. प्रेम आणि शिस्त या दोन्ही गोष्टी हातात हात घालून असतात, त्यामुळे मला वाटतं अशा परिस्थितीतच नव्हे तर नेहमीच आपण ठाम आणि न्याय्य किंवा योग्य भूमिका घेतली पाहिजे आणि तेच मी करणार आहे’ असं ते म्हणतात.