Jaideep Ahlawat Recalls His Village Life: बॉलीवूड अभिनेता जयदीप अहलावत याचे नाव इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. हरियाणातील एका छोट्या गावातून स्वप्नांच्या शहरात मुंबईत येणे त्याच्यासाठी सोपे नव्हते.
MensXP शी झालेल्या संभाषणात, जयदीप अहलावतने गावातील जीवनापासून ते मुंबईच्या ग्लॅमरपर्यंतच्या त्याच्या प्रवासाची कहाणी सांगितली. त्याने सांगितले की, तो त्याच्या गावात गाईचे शेण गोळा करायचा. तो म्हणाला, “मी गाईच्या शेपटीला धरून पोहायला शिकलो.” जयदीप अहलावतने सांगितले की, त्याचे गावातील जीवन खूप आनंददायी होते.
जयदीप म्हणाला की, त्याच्याकडे वर्षातून बुटाच्या एकापेक्षा जास्त जोड्या घेणे परवडण्याइतके पैसे कधीच नव्हते आणि आज त्याचे आवडते घर खरेदी केल्यानंतरही तो समाधानी नाही. जयदीप म्हणाला, “१५ वर्षे मी मुंबईतील २ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होतो. जेव्हा मी माझे स्वप्नातील घर खरेदी केले तेव्हा माझा पुढचा विचार होता की, पुढच्या वेळी मी एक मोठे घर घेईन. हा मानवी स्वभाव आहे, आपल्याकडे जे आहे. त्यावर आपण कधीही समाधानी नसतो.” वृत्तानुसार, जयदीप अहलावतने जून २०२५ मध्ये दोन महिन्यांच्या अंतराने मुंबईत दोन आलिशान मालमत्ता खरेदी केल्या आहेत.
जयदीप अहलावत पुढे म्हणाला, “गावातील जीवन अदभुत होते. ते वेगळे होते; पण कठीण नव्हते. कोणत्याही सांसारिक चिंता नव्हत्या. तुम्हाला जज करण्यासाठी कोणीही नव्हते. गावातून मुंबईत आल्याने खूप बदल झाले. कधी कधी ते खूप मोठे बदल वाटले. शेण उचलण्यापासून ते सेव्हन स्टार हॉटेलच्या रूफटॉपवर पार्टी करण्यापर्यंत, मी ते सर्व पाहिलं.”
जयदीप अहलावत म्हणाला, “मी एका गावात राहिलो आहे. त्यानंतर रोहतक, मग पुणे आणि आता मुंबईत. मी अक्षरशः एका राजवाड्यातही राहिलो आहे. माझ्या आयुष्यानं मला जग फिरण्याची आणि वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची संधी दिली आहे. आता मी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अधिक जागरूक आहे. जयदीप अहलावतची एकूण संपत्ती सुमारे २८ कोटी रुपये असावी, असा अंदाज आहे.
जयदीप अहलावतने २००८ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली; परंतु त्याची खरी ओळख ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर त्याने विविध भूमिका साकारत इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर जयदीप अहलावत शेवटचा सैफ अली खानबरोबर ‘ज्वेल थीफ’मध्ये दिसला होता. तो ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसला होता. तो पुढे शाहरुख खानच्या ‘किंग’मध्ये दिसणार आहे.