बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ पाहून ती वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जाते. आता जॅमीने कॉमेडी नाही तर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जॅमीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी अक्षय कुमारच्या ‘भूतनीके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ती जर उत्तम विनोद करू शकते तर ती उत्तम डान्सपण करू शकते हे या व्हिडीओतून तिने दाखवून दिलं आहे.”आज आनंदाचा दिवस आहे,” अशा आशयाचे कॅप्शन जॅमीने तो व्हिडीओ शेअर करत दिले आहे. जॅमीच्या या व्हिडीओला २८ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

जॅमी ही जॉनी लिव्हरची मुलगी असली तरी तिने स्वत: च्या मेहनतीवर सिनेसृष्टीत नाव कमावले आहे. सोशल मीडियावर जॅमीचे लाखो चाहते आहेत. २०१२मध्ये जॅमीने तिच्या करिअरची सुरूवात स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून केली. जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हाऊसफुल ४’ मध्ये तिने गिगलीची भूमिका साकारली होती.