बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘रुही’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, करोनासारख्या परिस्थितीमध्ये लोकांना एकत्र येऊन चित्रपट पाहायला सांगणे ही गोष्ट करायला कोणत्याही कलाकाराला आवडणार नाही. तरी देखील जान्हवी ‘रूही’चे प्रमोशन करत आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, ” काही प्रमोशन आम्ही प्रत्यक्षात लोकांना भेटून करत आहोत. एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर जाऊन लोकांना भेटण्याची एक वेगळीच मजा येते. माझा पहिला चित्रपट ‘धडक’नंतर मी हे केले नव्हते. कारण माझा दुसरा चित्रपट ‘गुंजन सक्सेना’चे प्रमोशन ऑनलाईन झाले होते” असे जान्हवी म्हणाली.

पण एवढी जोखीम का घ्यावी? असा प्रश्न विचारता जान्हवी म्हणाली, “आम्ही लोकांना ‘रुही’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये येण्यास सांगत आहोत. जर आम्ही त्यांना घरी बसून असे करायला सांगितले, तर ते आमचं का ऐकतील? करोना कुठे ही जाणार नाही आहे. सर्व आवश्यक गोष्टींची काळजी घेत आपण पुढे जाणे आवश्यक आहे.”

या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्माची खास विनोदी शैली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.