जया बच्चन अनेकदा पापाराझींबरोबरच्या त्यांच्या वागण्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांचा आणखी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीला ढकलताना आणि त्याच्यावर रागावताना दिसत आहेत. त्यांचे हे वागणे पाहून नेहमीप्रमाणेच नेटकरी त्यांना अहंकारी म्हणत आहेत.

हा व्हिडीओ निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी (१२ ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमाला जया बच्चन उपस्थित होत्या. यावेळी एका व्यक्तीने त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, जे पाहून जया बच्चन खूप संतापल्या. जया बच्चन यांना हे अजिबात आवडले नाही. त्यांनी त्या व्यक्तीला ढकलले आणि “तू काय करतोयस? काय आहे हे?” असे रागाने म्हटले. त्यांना रागावलेले पाहून ती व्यक्ती स्तब्ध झाली आणि जया त्याच्याकडे रागाने पाहत राहिल्या. हा व्हिडीओ ANI वर शेअर करण्यात आला आहे.

ही घटना तेथील उपस्थितांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण म्हणत आहेत की त्या खूप गर्विष्ठ आहेत आणि म्हणूनच त्या इतर लोकांशी वाईट वागतात. काहींनी अशीही कमेंट केली की, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्याबरोबर सेल्फी काढणे चुकीचे आहे. एकाने लिहिले, “फक्त वेडा माणूसच यांच्याबरोबर सेल्फी काढू शकेल.”

जया यांचा संयम सुटण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्यांचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. राणी मुखर्जी आणि काजोल यांचे काका रोनो मुखर्जी यांच्या निधनानंतर झालेल्या प्रार्थना सभेतही असेच काहीसे घडले होते. जया बच्चन त्यांच्या शोकसभेत पोहोचल्या होत्या. पापाराझींनी त्यांना पाहताच त्यांनी फोटो आणि व्हिडीओसाठी त्यांना घेरले, ज्यामुळे त्या संतापल्या होत्या. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये त्या म्हणत होत्या, “चला…तुम्ही लोकही सोबत या…चला.” त्यावेळीही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल केले होते.

जया बच्चन या सुप्रसिद्ध अभिनेत्री असून त्या कायमच चर्चेत असतात. जया यांचा चाहतावर्गसुद्धा खूप मोठा आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केल्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. पण, हल्ली जया बच्चन त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्या पापाराझींवर, चाहत्यांवर रागावलेल्या दिसतात. जया यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.