बॉलिवूडचे स्टायलिश अभिनेते कबीर बेदी यांचं जीवन कायम विवादांनी भरलेलं होतं. 30 वर्षांनी लहान मुलीसोबतचं अफेअर किंवा मग त्यांचं लग्न अशा एक ना अनेक विवादांमुळे ते कायम चर्चेत आले. ७५ वर्षीय अभिनेते कबीर बेदी पुन्हा एकदा चर्चेत आलेत. नुकतंच त्यांनी त्यांची ऑटोबायॉग्रफी ‘आय मस्ट टेल: द इमोशनल जर्नी ऑफ एन अ‍ॅक्टर’ रिलीज केलीय. यात त्यांनी पत्रकारितेतील करिअर, अभिनय आणि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यातील अनेक सिक्रेट्स शेअर केले आहेत.

अभिनेते कबीर बेदी यांनी एका माध्यमाला मुलाखत दिलीय. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही खाजगी गोष्टी शेअर केल्या आहेत. अभिनेते कबीर बेदी त्यांच्या आयुष्यातील एका टप्प्यावर मनाने पूर्णपणे कोलमडून गेले होते. त्याप्रसंगी ते खूप काही गमावून बसले होते. पण अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही आणि पुन्हा नव्या जोमाने ते उभे राहिले. यात ते यशस्वी देखील झाले.

अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्यामुळे कबीर बेदी यांना खूप मोठा धक्का बसला होता. कबीर यांचा मुलगा सिद्धार्थला सीजनोफ्रेनिया नावाचा आजार होता. १९९७ साली वयाच्या २६ व्या वर्षी सिद्धार्थने आत्महत्या केली होती. या धक्क्यातून कबीर बेदी थोडे सावरले होतेच, हॉलिवूडपर्यंत त्यांचा प्रवास पोहोचल्यानंतर त्यांना दिवाळखोर ठरवण्यात आलं. जेम्स बॉन्ड फिल्म Octopussy या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कबीर यांना दिवाळखोरीमुळे जो अपमान सहन करावा लागला त्याबद्दल सुद्धा कबीर यांनी काही खुलासे केले.

जीवनात अनेक धक्के सहन केल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीनं जगण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी या मुलाखतीत मांडला. ते म्हणाले, “मुलाची आत्महत्या आणि हॉलिवूडमधल्या अपमानामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. पण आई-वडिलांच्या शिकवणीमुळेच मी यातून सावरू शकलो. स्वतःच्या धर्मासोबतच शीख आणि बौद्ध धर्माबाबत सुद्धा माझ्या आई-वडिलांनी मला शिवकण दिली होती. आयुष्यातील अशा मोठ मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठीच नाही तर पुन्हा उभारी घेण्यासाठी ही शिकवण माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली.”

कबीर बेदी यांचे चार विवाह झाले आहेत. ३० वर्षाने लहान असलेल्या परवीन दुसांझ सोबत लग्न केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका करण्यात आली होती. ते दोघेही खूप चांगले मित्र-मैत्रिणी होते. जवळपास १० वर्षाच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केलं. कबीर यांच्या लग्नाला मुलगी पूजा बेदीचा नकार होता. इतकंच नव्हे तर तिने परवीनला डायन म्हटलं होतं.