दाक्षिणात्य इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या रावचे सावत्र वडील रामचंद्र राव हे कर्नाटकातील आयपीएस अधिकारी आहेत. रान्या रावने १५ दिवसांतून चार वेळा दुबईला ये-जा केल्यामुळे ती पोलिसांच्या रडारवर आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी रात्री बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री रान्या रावकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रान्याला अटक केली आहे. अटकेनंतर तिला आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आलं, याठिकाणी अभिनेत्रीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रान्या या तस्करी प्रकरणात एकटी होती की, दुबई-भारतादरम्यान कार्यरत असलेल्या मोठ्या तस्करी टोळीचा भाग होती, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्यानंतर ही अभिनेत्री त्यांच्या रडारवर आली. सोमवारी भारतात परतल्यावर तिची चौकशी करून, ही कारवाई सुरू करण्यात आली.

३३ वर्षीय रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. ते कर्नाटक राज्य, पोलीस गृहनिर्माण महामंडळात पोलीस महासंचालक (डीजीपी) पदावर कार्यरत आहेत. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या राव दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. ती वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करत असल्याने तिच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. पोलिसांना तिच्यावर संशय आला होता, सोमवारी ती भारतात परतल्यानंतर तिच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं आहे की, रान्या रावने कस्टम्स तपासणीला बगल देण्यासाठी सावत्र वडिलांच्या नावाचा व त्यांच्या पदाचा उल्लेख केला होता.

विमानातून उतरताना तिने कर्नाटकच्या डीजीपींची मुलगी असल्याचा दावा केला होता. तसेच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घरी सोडण्यास सांगितलं. तपासकर्त्यांनी असंही सांगितले की, ती बरेच दिवस या सोन्याच्या तस्करीत सहभागी होती. तिच्या कपड्यांना आतील बाजूने सोन्याचा मुलामा होता. हे सोनं बाहेर काढलं तेव्हा त्याचं वजन सुमारे १४.८ किलो होतं.

दरम्यान, रान्या कन्नड सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने सुपरस्टार सुदीपबरोबर ‘माणिक्य’ (२०१४) या चित्रपटात भूमिका साकारली होती. याशिवाय तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kannada actress ranya rao arrested at bengaluru airport for smuggling gold sva 00