टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये गेल्या अनेक वर्षापासून बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमना खान होस्ट करताना दिसून येतोय. पण यंदाच्या वर्षी ज्याप्रमाणे या ‘बिग बॉस’ने प्लॅटफॉर्म बदललाय, त्याचप्रमाणे शोसाठीचा होस्ट देखील बदलला असल्याची चर्चा सुरूय. काही दिवसांपूर्वीच हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याबाबत घोषणा झाली होती. त्यानंतर आता बिग बॉस ओटीटीमध्ये सलमान खान नव्हे तर करण जोहर होस्ट करताना दिसून येणार आहे.
करण जोहरने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही माहिती दिलीय. “ओके, मी आलोय…#bigbossOTT चा होस्ट…भरपूर मजा, मस्ती…वेडेपणा आणि भरपूर मसाला…लवकरच…” असं लिहित करणने त्याचा हा फोटो शेअर केलाय.
IANS ने दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरने बिग बॉस ओटीटीसाठीची आपली उत्सुकता व्यक्त केलीय. यावेळी करण जोहर म्हणाला, “माझी आणि मी बिग बॉसचे खूप मोठे फॅन आहोत…एकही दिवस आम्ही हा शो मिस करत नव्हतो…एक प्रेक्षक या नात्याने बऱ्याचशा ड्रामाने मला हा शो एंटरटेनींग वाटतो. हा शो होस्ट करणं मला आवडेल…आणि आता बिग बॉस ओटीटी…ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे…”
शो होस्ट करण्यासाठी करतोय प्रतिक्षा
यापुढे बोलताना करण जोहर म्हणाला, “बिग बॉस ओटीटीमध्ये भरपूर सेंसेशन आणि ड्रामा असणारेय…मी आशा करतो की प्रेक्षक आणि माझ्या मित्रांच्या आशा मी पूर्ण करू शकेल…स्पर्धकांसोबत विकेंडचा वार माझ्या स्टाईलने खूपच मजेदार असणार आहे. फक्त प्रतिक्षा करतोय…”
बिग बॉस ओटोटीचा प्रिमियर येत्या ८ ऑगस्ट रोजी डिजिटल प्लेटफॉर्म वूट वर होणारेय. सुरवातीचे सहा आठवडे बिग बॉस ओटीटीवर करण जोहर होस्ट करताना दिसून येणार आहे. बिग बॉस ओटीटीवर एपिसोड रिलीज केल्यानंतर बिग बॉस १५ पुन्हा त्याच्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच कलर्स चॅनलवर दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमान खानने बिग बॉस ओटीटीचा पहिला प्रोमो रिलीज केला होता. सध्या या शो मधील स्पर्धकांच्या नावावर चर्चा सुरू आहेत. यंदाच्या सीजनमध्ये काही सामान्य व्यक्ती सुद्धा दिसून येणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी के मजे लूट, पहली बार स्टार्टिंग ओनली ऑन वूट.’, अशी टॅगलाईन ठेवण्यात आलीय.