करण जोहरनं ‘दोस्ताना २’ सिनेमातून कार्तिक आर्यनचा पत्ता कट केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. कार्तिकच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं कारण धर्मा प्रोडक्शनने दिलं. त्यानंतर पहिल्यांदाच कार्तिक आर्यन इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह दिसला. कार्तिक आर्यनला धर्मा प्रोडक्शननं ‘दोस्ताना २’ चित्रपटातून बाहेर काढल्यापासून त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर कोणत्याच पोस्ट शेअर केल्या नव्हत्या.
पहिल्यांदाच कार्तिक आर्यननं कोरोनाबाबत एक संदेश लिहीत आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात त्याने आपल्या चेहऱ्यावर मास्क घालून काढलेला एक मोनोक्रोन फोटो शेअर केला आहे. काळ्या रंगाचा जॅकेट घालून आणि त्याचे लांब केस मोकळे सोडून त्याने हा मोनोक्रोन फोटो शेअर केलाय. या फोटोला कोणतही कॅप्शन न देता फक्त मास्क घातलेला एक फोटो त्याने शेअर केलाय. या फोटोला त्याने कॅप्शनमध्ये फक्त एक इमोजी दिलाय. मास्क घातलेलं इमोजी देत त्याने चाहत्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलंय.
‘दोस्ताना २’ मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिक आर्यननं शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनं प्रतिसाद देत सोशल मिडीयावर त्याचं स्वागत केलं. ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढल्यानंतर त्याचे फॅन्स सोशल मिडीयावर त्याला पाठींबा देताना दिसत आहेत.
वाचा: सलमान खानच्या ‘राधे’ वर सोशल मीडियावर बहिष्कार; ट्रेलर पाहून सुशांतचे चाहते भडकले
कार्तिक आर्यन त्याच्या ट्विटर हॅंडलवरही अॅक्टीव्ह झालेला दिसून आला. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याच्या मित्राला प्रयागराजमध्ये रुग्णवाहिकेची गरज असल्याचं ट्विट करत मदत केली होती. आता कार्तिककडे ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट आहे. ज्यात तो कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याचा धमाका हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.