बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’च्या सेटवर भावूक झाली. यावेळी ती आपले अश्रू रोखू शकली नाही. ‘डान्स दिवाने ३’ च्या सेटवर एक परफॉर्मन्स पाहून माधुरी दीक्षितने बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांची आठवण काढली. सरोज खान आणि माधुरी दीक्षित यांच्यामधील गुरू-शिष्यांच्या नात्याबद्द्ल सगळ्यांनाच माहिती आहे. सरोज खान यांच्या आठवणी सेट शेअर करत असताना यावेळी माधुरी दीक्षितला तिचे अश्रू आवरता आले नाही.

सरोज खान यांचं गेल्या वर्षी निधन झालं कलर्स चॅनलवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’ च्या सेटवर दोन स्पर्धकांनी माधुरी दीक्षित आणि सरोज खान यांचं शेटवचं गाणं ठरलेल्या ‘तबाह हो गया’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला. दोघांच्या भावनात्मक परफॉर्मन्समुळे माधुरी भावूक झाली. त्यांच्या डान्सनंतर संपूर्ण सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच तिन्ही जजने त्यांचे कौतुक केले. हा परफॉर्मन्स पाहून माधुरी दीक्षितने सरोज खानच्या आठवणींना उजाळा दिला.

या शोमधील सुत्रसंचालक भारतीने माधुरी दीक्षितला प्रश्न केला, “तुमच्यावर कधी सरोज खान ओरडल्या आहेत का ?” यावर उत्तर देताना माधुरी दीक्षित म्हणाली, “होय, त्या माझ्यावर कित्येकदा ओरडल्या आहेत…एकदा तर मी रडत होती म्हणून त्या माझ्यावर रागवल्या होत्या….माझे दिग्दर्शक माझ्यावर ओरडले होते म्हणून मी रडायला लागली होती आणि माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहत होते…हे पाहून तु रडते का ? असं बोलून त्या आणखी माझ्यावर ओरडल्या…आयुष्यात काहीही झालं तरी रडायचं नाही…असं त्यावेळी म्हणाल्या होत्या…सेटवर प्रत्येक वेळी त्या मला हिंमत देत होत्या…मला त्यांची खूप खूप आठवण येतेय…!”

सरोज खान यांची आठवण काढत झाली भावूक
यापुढे सरोज खान यांच्यासोबतच्या आणखी काही गोष्टी शेअर करताना माधुरी दीक्षित म्हणाली, “मी त्यांच्याकडून खूप काही शिकलेय…एक्सप्रेशन्स, मूव्हमेंट्स, फिटनेस, कॅमेरासमोर कसं प्रेझेंटेबल दिसायचं हे सारं काही मी त्यांच्याकडून शिकलेय…”. पुढे बोलताना माधुरी म्हणाली, “मी ज्यावेळी माझ्या करियरला सुरवात केली होती, त्यावेळी सरोज खान यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती…त्यावेळी सगळे पुरूष कोरिओग्राफर्स असायचे….त्यांनी स्वतःला ‘मास्टरजी’च्या रुपात स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे…”.

१५ मे ला आहे माधुरी दीक्षितचा वाढदिवस
येत्या १५ मे रोजी ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने माधुरीला डेडीकेट करण्यासाठी ‘डान्स दिवाने ३’ चे दोन स्पर्धक पल्लवी आणि सिजा यांनी ‘कलंक’ चित्रपटाच्या ‘तबाह हो गए’ या गाण्यावर परफॉर्मन्स केला होता. हाच परफॉर्मन्स पाहून माधुरीला तिच्या गुरू सरोज खान यांची आठवण झाली.