अभिनेता संदीप पाठक हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. संदीपने आतापर्यंत अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप उमटवणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. पण सिनेसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी त्याला अथक मेहनत घ्यावी लागली. नुकतंच संदीप पाठकच्या चाहत्याने केलेल्या एका कृतीमुळे तो भावूक झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप पाठक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. नुकतंच त्याच्या एका चाहत्याने संदीप पाठक हे नाव हातावर गोंदवून घेतलं आहे. याबाबत एक पोस्ट संदीपने शेअर केली आहे. संदीपने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याचा चाहता महेश खुळखुळे याच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी महेशच्या हातावर संदीप पाठकचे नाव पाहायला मिळत आहे. महेशने त्याच्या हातावर संदीप पाठकचा फॅन असे लिहिले आहे.

आणखी वाचा- “काही तांत्रिक अडचणींमुळे…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील विवाह विशेष भागाबद्दल ‘झी मराठी’चे स्पष्टीकरण

“आपण आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत असतो कारण आपलं नाव कुठे तरी “नोंदवलं” जाईल ह्यासाठी, पण आपलं नाव “गोंदवलं” जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. महेश खुळखुळे ह्या माझ्या फॅनने “संदीप पाठक चा फॅन” असं कायम स्वरूपी गोंदवून (Permanent Tattoo) घेतलं आहे. किती प्रेम करतात लोक आपल्या कलेवर आणि आतल्या माणसावर…मी अजून मेहनत घेऊन, सातत्याने चांगलं काम करायला हवं ह्याची जाणीव करून देणारा हा प्रसंग. धन्यवाद महेश” असे संदीप पाठकने म्हटले आहे.

दरम्यान संदीप पाठकने आतापर्यंत श्वास, एक डाव धोबीपछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा, एक हजाराची नोट, येड्याची जत्रा, देऊळ बंद, डबल सीट, नटसम्राट, बेनवाड, ईडक, राख अशा अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान लवकरच तो श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या आपडी थापडी या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sandeep pathak followers permanent inked tattoo on hand facebook post viral nrp