Marathi Actor Angry Remark on Gautami Patil alleged Hit and Run Case : नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने ३० सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका रिक्षा चालकाला जोरात धडक दिल्याची घटना उघडकीस आली होती. त्या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून पसार होता. मात्र, अपघाताच्या काही तासांनंतर आरोपी चालकाला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं. तर या घटनेमध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दरम्यान, या अपघातप्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी पुणे पोलिसांनाही यासंदर्भात निवेदन दिलं आहे. अपघात झाला तेव्हा गौतमी कारमध्ये होती की नव्हती यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. गौतमी कारमध्येच होती असा दावा करत तिलाही अटक व्हायला हवी अशी मागणी काही लोकांनी केली आहे.
गौतमीला पोलिसांची नोटीस
यावर प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, “या अपघात प्रकरणातील आरोपी कार चालकाला अटक केली आहे. तसेच कार देखील जप्त करण्यात आली आहे. ही कार गौतमी पाटील यांच्या नावावर असल्याने त्यांना देखील नोटीस बजवली आहे.” तसेच अपघातावेळी गौतमी कारमध्ये नव्हत्या असंही कदम यांनी स्पष्ट केलं.
मराठी अभिनेत्याचा गौतमीवर संताप
गौतमी पाटील ही नृत्य करताना अश्लील हावभाव करते यावरून तिच्यावर अनेकदा टीका झाली आहे. तसेच त्याच्या नृत्यामुळे लावणी ही कला बदनाम झाल्याचाही ठपका ठेवला गेला आहे. गौतमी व तिच्याप्रमाणे नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या नृत्यांगनांनी महाराष्ट्राचा बिहार केल्याची टीका देखील अनेकदा ऐकायला मिळाली आहे. अशातच मराठी अभिनेता पवन चौरे याने देखील अशीच टीका करत गौतमीवर संताप व्यक्त केला आहे.
“गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा ठेका घेतलायस का?”
पवनने फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की “गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहेस. आता काय गोरगरीब जनतेलाही त्रास द्यायचा ठेका घेतलायस का? तुझी कार एका रिक्षाला उडवते आणि तिथून तू पळून जातेस. तसेच तुझ्या गाडीत कोण कोण होतं हे ही तुलाच माहीत. पोलीस यायच्या आधी तुझी गाडी उचलली जाते ते केवळ प्रकरण दाबण्यासाठी.”
पवन म्हणाला, “बिचाऱ्या रिक्षाचालकाला किती लागलंय, त्याच काय झालंय? याची चौकशी न करता तू तिथून पळ काढला, कारण तुझे काळे धंदे बाहेर येतील. आज रिक्षाचालक दीनानाथ रुग्णालयात व्हेंटीलेटरवर आहे. या घटनेला चार दिवस झाले तरी तू साधं एक माणुसकीच्या नात्याने विचारपुसही केली नाहीस. हेच तुझे संस्कार का? एक गोष्ट लक्षात ठेव, एक सामान्य माणूस कोणाला जितका वर घेऊन जातो तेवढाच खाली आपटू पण शकतो. तुझ्या या कृत्याचा जाहीर निषेध.”