Madhurani Prabhulkar on Sabar Bonda: अनेकदा कलाकार एखादी कलाकृती पाहिल्यानंतर व्यक्त होताना दिसतात. मग तो चित्रपट असो, वेब सीरfज असो किंवा एखादं नाटक असो. अनेक कलाकार वेळोवेळी त्यांनी पाहिलेल्या कलाकृतीबद्दल व्यक्त होताना दिसत आहेत.
‘आता आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने एका चित्रपटाबद्दल तिचे मत सांगितले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या मनात काय भावना होत्या, याबद्दल तिने वक्तव्य केले आहे.
“या फिल्मनं अतिशय…”
मधुराणी म्हणाली, “मी आताच साबर बोंडं ही मराठी फिल्म बघून बाहेर पडत आहे. खरं तर शब्द सुचत नाहीत. मन अत्यंत हळवं होऊन गेलं आहे. या फिल्मनं अतिशय मॅच्युअर, हळुवार सुंदर प्रेमकहाणी बघितल्याचा आनंद दिला आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “किती सुंदर फिल्म बनवावी. चित्रपट पाहताना फार मजा आली. मला खूप अभिमान वाटतोय की, आपल्या मराठीमध्ये असे चित्रपट बनत आहेत. ‘साबर बोंडं’च्या टीमचं प्रचंड कौतुक आहे. खूप शुभेच्छा! आम्हाला तुमचा अभिमान आहे. असेच चित्रपट बनवत राहा आणि आम्ही बघत राहू.”
पुढे मधुराणी चाहत्यांना उद्देशून म्हणाली की तुम्ही सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितलाच पाहिजे. मधुराणीच्या या व्हिडीओवर साबर बोंडं या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक रोहन कानवडेने कमेंट करीत तिचे आभार मानले आहेत. तर अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट्स करीत चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
‘साबर बोंडं’ या सिनेमाबद्दल बोलायचे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले आहे. २०२५ मध्ये पार पडलेल्या सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ‘साबर बोंडं’ला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकतेच मुक्ता बर्वेनेदेखील एक पोस्ट शेअर करीत चित्रपटाचे कौतुक केले होते. तसेच, आपल्या भाषेत असे सिनेमे पाहून अभिमान वाटत असल्याचे तिने लिहिले होते. आता प्रेक्षकांचा या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मधुराणीच्या कामाबद्दल बोलायचे, तर अभिनेत्रीला आई कुठे काय करते या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. मालिका संपल्यानंतर अभिनेत्री नाटकातूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील चाहत्यांच्या संपर्कात असते. आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.